20 दिवसातले तिसरे चक्रीवादळ; 130 किमी वेगाने वारे वाहणार, महाराष्ट्रातील हवामान कसं असेल?
बंगालच्या उपसागरात तिसरे चक्रीवादळ निर्माण होत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार का?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे.
या संभाव्य चक्रीवादळाला 'अक्वान' असे नाव देण्यात आले आहे.
रविवारी कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. मंगळवारी त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगालसह काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
अक्वान चक्रीवादळ शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपसागरातील वादळी प्रणालीचे केंद्र गेल्या तासाला सहा किमी वेगाने वायव्य दिशेकडे सरकत आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात अक्वान चक्रीवादळाचे रुपांतर होण्याची शक्यता आहे. आज पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे.
अक्वान चक्रीवादळ शुक्रवारी दुपारपर्यंत अति तीव्र होऊन आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीवर नेल्लोर आणी तुनीदरम्यान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीला धडकताना वाऱ्याचा वेग ताशी 120 ते 130 किमी राहणार आहे. तसंच, तब्बल 145 किमी वेगाने वारे वाहणार असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात गेल्या 20 दिवसांत तयार झालेले हे तिसरे चक्रीवादळ ठरणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यावरच चक्रीवादळ कोणत्या भागात जमिनीवर प्रवेश करू शकेल याविषयी सांगता येईल, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
चक्रीवादळामुळं कोणत्या राज्यांना इशारा
आंध्र प्रदेश व ओडिशा येथे 18 ते 21 नोव्हेंबरदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर तामिळनाडू व पुडुचेरी येथे 17 ते 19 नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पाऊस होणार असून महाराष्ट्रात या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे.