राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाला आज 10 महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स हॅण्डलवरुन एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांसोबतचा फोटो पोस्ट करताना आपल्या भावानांना वाट मोकळी करुन दिली आहे. मात्र याच पोस्टमध्ये त्यांनी सध्या डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन त्यांचा पक्ष म्हणजेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तळ्यात मळ्यात असल्याचं चित्र दिसत आहे. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर शुक्रवारी सायंकाळी या विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. असं असतानाच रोहित पवारांचा या विधेयकाला विरोध असल्याचं समजतं. त्यांनी आपलं म्हणणं शरद पवारांकडे मांडल्यानंतरही पक्षाने विधेयकाच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याने खरोखरच विधेयकाला समर्थन दिल्यानंतर भविष्यात पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाल्यास रोहित पवार काय करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. याच चर्चेला रोहित पवारांनी अजित पवारांचा संदर्भ देत सूचक उत्तर दिलं आहे. शरद पवारांच्या पक्षाने भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला तर रोहित पवार पुढे काय करणार याचं उत्तर त्यांनीच दिलं आहे.
अजित पवारांना जाऊन आज 10 महिने झाले
"आदरणीय अजितदादांना जाऊन आज 10 महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना एफआयआर झाला ना कुठला तपास झाला.... आभाळाएवढा माणूस गेला पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही," असं रोहित म्हटलं आहे.
शेवटची ओळ सूचक
यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे सध्या डिलिमिटेशनच्या विधेयकावरुन पक्षाच्या भूमिकेसोबत रोहित पवारांचे वैचारिक मतभेद असल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी पुढे सांकेतिक विधान केलं आहे. "2022 मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो. आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल...!" असं सूचक विधान रोहित पवारांनी पोस्टच्या शेवटी केलं आहे.
आदरणीय अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना FIR झाला ना कुठला तपास झाला.... आभाळाएवढा माणूस गेला पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही. २०२२ मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो.आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल...! #AjitdadaPawar
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 28, 2026

‘त्यागा’च्या रामायणाऐवजी ‘स्वार्था’च्या पायावर...
काल आव्हाड यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा जाहीर केल्यानंतर रोहित पवारांनी केलेल्या पोस्टमध्ये 'रामायण' चित्रपट पाहिल्याचा संदर्भ देत सूचक राजकीय विधान केलं होतं. "रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत काढून नवीन आलेला ‘रामायण’ चित्रपट बघण्याचा आज योग आला. यातील राजा दशरथाने दिलेलं वचन आणि या वचनासाठी नितीमत्तेला धरुन प्रभू श्रीरामाने केलेला सर्वस्वाचा त्याग बघून नेहमीप्रमाणे खूपच प्रभावित झालो.. पण प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या आयुष्यात नेमकं याच्या उलट घडताना आणि इतिहासाचाच संदर्भ द्यायचा तर ‘त्यागा’च्या रामायणाऐवजी ‘स्वार्था’च्या पायावर उभं असलेलं ‘महाभारत’च घडताना दिसतं... आणि हे पाहून मनाला अतिव दुःख आणि वेदना होतात..." असं रोहित पवारांनी म्हटलं होतं.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत काढून नवीन आलेला ‘रामायण’ चित्रपट बघण्याचा आज योग आला. यातील राजा दशरथाने दिलेलं वचन आणि या वचनासाठी नितीमत्तेला धरुन प्रभू श्रीरामाने केलेला सर्वस्वाचा त्याग बघून नेहमीप्रमाणे खूपच प्रभावित झालो.. पण प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या आयुष्यात नेमकं याच्या उलट घडताना आणि इतिहासाचाच संदर्भ द्यायचा तर ‘त्यागा’च्या रामायणाऐवजी ‘स्वार्था’च्या पायावर उभं असलेलं ‘महाभारत’च घडताना दिसतं... आणि हे पाहून मनाला अतिव दुःख आणि वेदना होतात...!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 27, 2026

दरम्यान, आज पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी, "रोहित पवारांचं काँग्रेसमध्ये 100 टक्के स्वागत केलं जाईल," असं सूचक विधान केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्याचं दिसून आलं.