किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेसकोड? एकनाथ शिंदेंना निवेदन सादर, भरत गोगावलेंच्या लेकाची मागणी
किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात येणार का? अशी चर्चा सध्या होतेय. जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी पाठपुरावा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
किल्ले रायगड हा महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराजांची राजधानी म्हणजे रायगड. वर्षभरातून हजारो पर्यटक रायगडाला भेट देण्यासाठी येतात. रायगडावर फिरण्यासाठी येणाऱ्या महिला पर्यटकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याची मागणी सध्या चर्चेत आली आहे. महाड जिल्हा परिषद सदस्य आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनीही मागणी केली आहे.
किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेस कोड असावा या मागणीसाठी महाडचे जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. गुरुवारी रायगडच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी रायगडावरील एका कार्यक्रमात एका लहान मुलीने विकास गोगावले यांची भेट घेऊन किल्ले रायगडावर महिलांना तोकड्या कपड्यात येण्यास बंदी करावी अशी विनंती केली होती. रायगडावरील कार्यक्रमादरम्यान एका छोट्या मुलीने गडाचे पावित्र्य व अस्मिता जपण्यासाठी पेहरावाबाबत विनंती केल्यानंतर हा मुद्दा पुढे आला आहे.
तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर पर्यटकांच्या पेहरावाबाबत निर्बंध घालण्याचा ठराव अखिल भारतीय मराठा महासंघानेही मांडला असून, ती सध्या केवळ संघटनेची मागणी आहे. अद्याप सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाहीय
किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेसकोड लागू करण्याची मागणी सध्या चर्चेत असली, तरी सध्या तिथे कोणताही अधिकृत शासकीय ड्रेसकोड लागू केलेला नाही. मात्र रायगडावर कोणताही सक्तीचा ड्रेसकोड नसला तरी ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य लक्षात घेऊन सभ्य पोशाख परिधान करण्यात यावे, अशी मते शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
रायगडाचे स्वराज्यासाठी महत्त्व
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरून स्वराज्याची राजधानी रायगडावर हलवली. येथूनच संपूर्ण स्वराज्याचा राज्यकारभार, परराष्ट्र धोरणे आणि लष्करी मोहिमांचे नियोजन केले जात असे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला चारही बाजूंनी खोल दऱ्या आणि उंच कड्यांनी वेढलेला आहे. इंग्रज इतिहासकारांनी याचे वर्णन "पूर्वेकडील जिब्राल्टर" (Gibraltar of the East) असे केले आहे.
हिरोजी इंदुलकर यांनी उभारलेली गडावरील बाजारपेठ घोड्यावरून बसून खरेदी करता येईल अशी रचना, अष्टप्रधान मंडळाचे वाडे, जगदीश्वर मंदिर, आणि पाण्याच्या साठवणुकीची अद्वितीय व्यवस्था ही मराठा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे आहेत. त्यामुळं रायगडावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.