राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑफरमुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झालीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेत प्रवेश केल्यास मंत्रिपद देण्याची तयारी मंत्री भरत गोगावले यांनी जाहीरपणे दर्शवली. त्यामुळे शरद पवार गटातील आमदारांना शिंदे गटाकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होतोय.
कार्तिकी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात आमदार अभिजीत पाटील त्यांच्यासोबत दिसले. पंढरपूरमधील पाहणीदरम्यान पाटील यांनी शिंदे यांना बुलेटवरून परिसराची माहिती दिली. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर शिंदे यांनी रस्तेमार्गे प्रवास करण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींमुळे दोघांमधील जवळीक चर्चेचा विषय ठरली.
21 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी शिंदे पुन्हा पंढरपुरात आले. यावेळी आमदार अभिजीत पाटील आणि राजू खरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचीही शिंदे यांच्याशी भेट झाली.
या सगळ्यात मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्याने चर्चेला अधिक रंग चढला. अभिजीत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना मंत्रिपद देऊ शकतो, असे गोगावले म्हणाले. एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी स्वतःचे अडीच वर्षांचे मंत्रिपद सोडण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ही ऑफर सार्वजनिक कार्यक्रमात देण्यात आली.
या ऑफरनंतर अभिजीत पाटील यांनी पक्षांतराचे संकेत दिलेले नाहीत. शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून मतदारसंघात आले होते. त्यांच्यासमोर मतदारसंघातील विकासकामांचे प्रश्न मांडणे आणि त्यांचा सत्कार करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोगावले यांनी दिलेली ऑफर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचेही पाटील म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबतही अद्याप ठोस निर्णय किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे नसल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत शिंदे गटाच्या मंत्र्याने दिलेली ऑफर आणि पंढरपुरातील भेटीगाठी यामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.