भिवंडीत गुन्हेगारीचे उदात्तीकरण, चाकू हल्ल्यातील आरोपीचा जामिनानंतर जल्लोष, फटाके फोडून मिरवणूक
Bhiwandi : चाकू हल्ला करून तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीला जामीन मिळताच त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
Bhiwandi Crime News : भिवंडी तालुक्यातून कायद्याला आव्हान देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकू हल्ला करून तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीला जामीन मिळताच त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढवलेला जितेंद्र पाल असल्याची माहिती समोर येत आहे.
भिवंडी तालुक्यातील माणकोली परिसरात 19 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. गरबा खेळून घरी जात असलेल्या आदित्य दुबे या तरुणावर जुन्या वादातून जितेंद्र पाल, हरेश दुबले आणि राहुल गोंड या तिघांनी साथीदारांच्या मदतीने चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते.
याप्रकरणी नारपोली पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जितेंद्र पाल याला जामीन मिळाल्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी तो भंडारी कंपाऊंड परिसरात दाखल झाला. यावेळी त्याच्या 30 ते 35 समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली.
हेही वाचा : ठाणेकरांना दिवाळी गिफ्ट! 2 मोठ्या प्रकल्पांबाबत आली गुड न्यूज, डिसेंबरमध्ये मेट्रो धावणार?
कारच्या सनरूफमधून बाहेर उभा राहून जितेंद्र पालने शक्तिप्रदर्शन केले, तर त्याच्या मागे 15 ते 20 बाईकस्वारांनी घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली. या मिरवणुकीमुळे परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या जल्लोषाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर 26 ऑक्टोबर रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात जितेंद्र पाल आणि त्याच्या 30 ते 35 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामीन मिळणे हा आरोपीचा कायदेशीर हक्क असला तरी, गंभीर गुन्ह्यातील आरोपीची मिरवणूक काढून दहशत पसरवणे हे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. पोलिस या व्हायरल व्हिडिओच्या आधारे पुढील कारवाई करत आहेत.