यंदा पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून आता त्याचे पडसाद बँकिंग क्षेत्रातही उमटण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, शेतीचे उत्पन्न घटले आणि परिणामी शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज फेडणे कठीण होऊ शकते. याचा परिणाम सरकारी बँकांच्या आर्थिक कामगिरीवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आयसीआसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील परिस्थितीमुळे बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेवर तुलनेने अधिक दबाव येऊ शकतो. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
2026 च्या जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशात सरासरीपेक्षा सुमारे 13 टक्के कमी पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, या काळात देशात 759.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सामान्य पावसाचे प्रमाण 868.6 मिलिमीटर आहे. गेल्या दशकातील सर्वात कमी पावसाच्या हंगामांपैकी हा एक ठरला आहे. कमी आणि असमान पावसाचा परिणाम शेती उत्पादनावर झाला असून काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाची कमतरता आणि शेतीवरील परिणाम अधिक गंभीर आहेत. या राज्यांमध्ये कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात कर्ज देणाऱ्या बँकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेचा कृषी कर्जातील सहभाग तुलनेने अधिक असल्याने या दोन बँकांकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जफेडीची परिस्थिती आगामी आर्थिक वर्षात महत्त्वाची ठरणार आहे.
शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी बँकांकडून पीककर्ज दिले जाते. मात्र, पाऊस कमी झाल्यामुळे उत्पादन घटले आणि शेतमालातून मिळणारे उत्पन्न कमी झाले, तर कर्जाचे हप्ते भरणे कठीण होते. अशा परिस्थितीत कर्जफेड लांबणीवर पडू शकते किंवा कर्ज थकीत होण्याचा धोका वाढतो. कॅनरा बँकेच्या देशांतर्गत एकूण कर्जापैकी 22.9 टक्के कर्ज कृषी क्षेत्राशी संबंधित असल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील अडचणींचा बँकेच्या आर्थिक निकालांवर परिणाम होऊ शकतो.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पीककर्जांपैकी 35 टक्के कर्जांचे पुनर्गठन केल्यास काही बँकांच्या आर्थिक वर्ष 2026-27 मधील प्रति शेअर कमाईवर (EPS) 1 ते 4 टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हा अंदाज व्यक्त केलाय. या कर्जांचे पुनर्गठन करण्यासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपयांपर्यंतची रक्कम लागू शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांवरील तातडीचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (SLBC) कडून कृषी कर्ज पुनर्गठनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पुनर्गठन म्हणजे कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिक वेळ देणे किंवा हप्त्यांच्या अटींमध्ये बदल करणे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने हप्ता भरण्याचा दबाव कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.