सोन्याने भरलेले सात हंडे, जालन्यात गुप्तधनासाठी शेतातच अघोरी विधी, पूजा सुरू करणार इतक्यात...
शेतातील गुप्तधन सोधण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.
शेतकऱ्याच्या शेतात गुप्तधन म्हणून सोन्याने भरलेले हंडे काढण्यासाठी अघोरी पुजा करताना 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील टकले पोखरी शिवारात ही घटना घडली आहे. या प्रकरणी परतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडालीय
गुप्तधन म्हणून शेतातील जमिनीत असलेले सोन्याचे 7 हंडे काढण शेती मालक, भोंदूबाबासह 9 जणांच्या चांगलंच अंगलट आलंय. गुप्तधन काढताना परतूर पोलिसांनी या 9 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जालन्यातील मंठा तालुक्यातील टकले पोखरी शिवारात रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
नेमकं झालं काय?
मंठा तालुक्यातल्या टकले पोखरी शिवारात शेतकरी शिवलाल राठोड याच्या शेतात सोन्याचे 7 हंडे पुरलेले आहेत अशी बतावणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चारठाणा येथील एका बाबानं केली होती. हे सर्व जण रात्रीच्या वेळी टकले पोखरी शिवारात आले आणि त्यांनी जमिनीत पुरून गुप्तधन म्हणून पुरून ठेवलेले सोन्याचे 7 हंडे काढण्यासाठी अघोरी पूजा सुरू केली आणि तेवढ्यात पोलीस घटनास्थळी पोहचले मग काय शेतमालक,भोंदूबाबासह एकूण 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी या प्रकरणात 9 आरोपींना ताब्यात घेतलं असून दहावा आरोपी फरार झालाय. सध्या फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय. शिवाय पोलिसांनी घटनास्थळावरून इनोवा कार, खोदकामाचे लोखंडी साहित्य, काठ्या, छत्री, लिंबू नारळ, कुंकू, बदाम, सुपारी आणि सुरमा असं जादुटोणा आणि अघोरी पूजेचं साहित्यही जप्त केलंय. या आरोपींनी या आधी कुठे अशा अघोरी पूजा केल्या आहेत का,शिवाय जादूटोणा करून कुणाची फसवणूक केलेली आहे का याचा सध्या पोलिसांकडून तपास करण्यात येतोय
गुप्तधनाच्या लालसेपोटी करण्यात आलेल्या या अघोरी पूजेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4, अहमदनगर जिल्ह्यातील 2, जालना जिल्ह्यातील 3 आरोपींचा समावेश आहे. तर एक जण अजूनही फरार झालाय. त्यामुळे या अघोरी पूजेत आणखी कुणी सहभागी आहे का याचा देखील पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय.