महाराष्ट्रातून मान्सूनने मघार घेतली आहे. त्यामुळं यंदाचा पावसाळा संपुष्टात आला आहे. यंदा एल निनोचे सावट होते. यामुळं राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळं राज्यात तब्बल 19 टक्के तूट नोंदवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, महाराष्ट्रात 30 सप्टेंबरपर्यंत804.4 मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या 5 वर्षांतील पावसाचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
राज्यात यंदा 19 टक्के कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या नोंदीनुसार यंदा केवळ 40 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. 41 तालुक्यांत 25 ते 50 टक्क्यांदरम्यान, तर 167 तालुक्यांत 50 ते 75 टक्क्यांदरम्यान पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील धरणांतील जलसाठ्यात भरपावसाळ्यात घट होऊ लागली असून, गेल्या 25 दिवसांत उपयुक्त जलसाठा तब्बल 1336.8 दशलक्ष घनमीटरने (3.27 टक्के) घटला, ही चिंतेची बाब आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस होतो. त्याचा खरिपाला लाभ होतो. धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होते. या वर्षी मात्र ऑक्टोबर महिना कोरडा केला आहे. 1 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात 38.4मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, या कालावधीत महाराष्ट्रात केवळ 0.9 मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 98 टक्के आहे.
मुंबईत एकीकडे 10 टक्के पाणीकपातीमुळे अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच कमी पर्जन्यमानामुळे यंदा जलसाठा कमी झाला आहे. तसेच पाणीचोरी आणि गळतीचे प्रमाण 34 टक्के असताना आता वाढत्या तापमानामुळे धरणांतील बाष्पीभवनानेही चिंता वाढवली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधून दररोज सुमारे 250 दशलक्ष लिटर पाण्याची वाफ होत असल्याने मुंबईकरांच्या वाट्याला तितके कमी पाणी येत आहे.
मोडक सागर धरणातून दररोज 43.29 दशलक्ष लिटर, तानसा धरणातून 48.60 दशलक्ष लिटर, तर मध्य वैतरणा धरणातून 34.1 दशलक्ष लिटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. उर्वरित धरणांतूनही जवळपास याच प्रमाणात पाणी हवेत विरत असून, एकूण बाष्पीभवन दररोज 250 दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी ही घट तुलनेने कमी होती.