अरबी समुद्रात 900 मीटरवर चक्रकार वाऱ्यांची स्थिती; राज्याच्या हवामानावर मोठा परिणाम, गुलाबी थंडीची चाहूल कधी?
उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला असला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यामध्ये रात्रीच्या वेळी गारवा जाणवतो
पावसाने माघार घेताच उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 34 अंशांच्या पुढे गेला आहे. तर, किमान तापमान 13 अंशापर्यंत खाली आले आहे. राज्यातील काही ठिकाणी उन्हाची काहिली दिसून येते. तर रात्री व पहाटेच्या वेळी काहीसा गारवा जाणवतो. आज राज्यातील तापमानात काहीसा चढ-उतार राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढाच असून 36, 35 अंशापर्यंत पोहोचतो. आज दिवसभरात राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना रात्री गारवा आणि दिवसा उन्हाच्या काहिलाचा सामना करावा लागू शकतो.
राज्याच्या किमान तापमानात मात्र घट होताना दिसतेय. पुणे, नाशिक येथे तापामनाचा पारा घसरताना दिसतोय. नाशिकच्या निफाड येथे गुलाबी थंडीचे आगमन झाले असून शनिवारी पारा 12 अंशांवर स्थिरावला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबला, आता थंडीचे आगमनही उशिराने झाले आहे. निफाडच्या गहू संशोधन केंद्रातील तापमान नोंदीत पारा 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला.
पुण्यात गारठा वाढणार
ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर सुरू झाला तरी पुणेकरांना अद्यापही अपेक्षित थंडीची प्रतीक्षा आहे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री जाणवणारा हलका गारठा असे समुद्र वातावरण सध्या शहरात अनुभवायला मिळत आहे मात्र पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.