'अकवान' चक्रीवादळाचा परिणाम, महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार? नोव्हेंबरच्या अखेरीस हवामान फिरणार...
राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली असली तरीही दिवसा उकाडा कायम होता. मात्र आता वातावरण बदलले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अकवान चक्रीवादळामुळं महाराष्ट्रातही हवामानावर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून त्यामुळं राज्यातील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे.
अकवान चक्रीवादळामुळं राज्यातील थंडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून दक्षिण भारताच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे सध्या मुंबईसह राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं थंडीचा प्रभाव कमी असेल.
चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तर भारताकडून दक्षिणेकडे वाहणारे थंड वारे पुन्हा वेग पकडतील. त्यामुळं नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळं निर्माण झालेली मध्य प्रदेश आणि आसपास असलेली थंड हवा महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात होईल. त्यामुळं किमान तापमानात घट होईल. राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात 8 अंश सेल्सिअस तर मुंबईत किमान तापमान 15 अंशाच्या आसपास नोंदवली जाईल.
आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, शनिवारपासून विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता कमी जाणवेल, त्यानंतर पुढील काही दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंशानी वाढ होण्याचा अंदाजही आहे.
रायगडमध्ये गुलाबी थंडीची चाहूल
रायगडकरांना आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. सकाळी आणि रात्री हवेत चांगला गारवा निर्माण होतोय. विशेषतः ग्रामीण भागात गारठा अधिक आहे. सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळते त्यामुळे महामार्गावरील दृश्यमानता कमी होते . वाहन चालकांना सकाळी 8 वाजेपर्यंत दिवे लावून प्रवास करावा लागतोय. दुपारच्या वेळी जाणवणारा उन्हाचा तडाखा देखील कमी झालाय. या थंडीमुळे आंबा काजू पिकांना मोहोर येण्यास मदत होईल असा अंदाज आहे.