राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, या जिल्ह्यांत पारा 15 अंशावर; असं असेल आजचं हवामान
राज्यात गुलाबी थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. आज राज्यात कसे असेल हवामान, जाणून घ्या.
राज्यात पहाटेचा गारवा जाणवत असून किमान तापमानाचा पारा 15 अंशांच्या खाली घसरायला सुरुवात होत आहे. आज महाराष्ट्रात तापमानातील चढ-उतार होताना दिसत आहे. हिच परिस्थिती कायम राहणार, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सोमवारी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात निच्चांकी 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर नाशिकमध्ये किमान पारा 14.2 अंशांवर पोहोचले असून दोन दिवसांत 3.9 ने घट झाली आहे. काही दिवसांपासून असलेले ढगाळ हवामानाचे सावट दूर होताच थंडीची एन्ट्री झाली आहे.
दक्षिण कोकण आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 3.1 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. काही ठिकाणी पहाटे गुलाबी थंडी पडतेच. तर सकाळी पुन्हा तापमान वाढ होण्यास सुरुवात होते. कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 37.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांना पहाटे चांगल्याच हुडहुडीचा सामना करावा लागतो. पहाटे मॉर्निंग वॉक, सायकलिंगसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना स्वेटर, जॅकेट्स आणि कानटोप्यांचा आधार घ्यावा लागतोय. सोमवारी 12.4, जळगाव 13.6 अंश सेल्सियस, पुणे, नाशिक, परभणी, गोंदिया, यवतमाळ येथे 15 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झालीये. त्यामुळं हवेत गारठा जाणवतोय.
राज्यात काही ठिकाणी पहाटेच्या वेळी हलके धुके जाणवण्याची शक्यता असून, हवेतील आर्द्रतेतही वाढ होत आहे. मात्र, पुढील चार ते पाच दिवस या विभागात कोणताही हवामान अलर्ट देण्यात आलेला नाही. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री सुखद गारवा असे वातावरण नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. दिवाळीत आता हळूहळू थंडीला सुरुवात होत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.