SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'पाण्याने खूप मोठा धोका दिला ओ सर..', दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा ऐकून मानसी नाईक भावुक; 21 जनावर विकण्याची वेळ

बुलढाण्यातील नाईकनगरमध्ये 21 जनावरं सांभाळणाऱ्या शेतकऱ्यावर ती विकण्याची वेळ आलीय. पाणीटंचाईची व्यथा ऐकून मानसी नाईक भावुक झाली. झी 24 तासच्या उत्सव बांधिलकीचा उपक्रमात एक भावनास्पर्शी क्षण घडला.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 08, 2026, 22:31 IST | Updated: Nov 09, 2026, 14:23 IST
Image Credit: मानसी नाईक
Join

दुष्काळ माणसाला केवळ पाण्यापासून वंचित ठेवत नाही, तर त्याच्या जगण्याचा आधारही हिरावून घेतो. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील नाईकनगर गावात याच संकटाचे विदारक चित्र पाहायला मिळाले. एका शेतकऱ्याने 21 जनावरं सांभाळूनही आता ती विकण्याची वेळ आल्याची व्यथा मांडली. त्याचे बोलणे ऐकून अभिनेत्री मानसी नाईक यांनाही अश्रू अनावर झाले. झी 24 तासच्या ‘उत्सव बांधिलकीचा’ या उपक्रमांतर्गत ‘दिवाळी बळीराजाच्या दारी’ हा विशेष उपक्रम नाईकनगरमध्ये राबवण्यात आला.

झी 24 तासची टीम शेतकऱ्यांच्या बांधावर

झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी गावातील एका शेतकऱ्यांशी संवाद साधत त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी शेतकऱ्याने आपल्या घरातील २१ जनावरांची व्यथा सांगितली. अनेक वर्षे कष्टाने गोधन सांभाळले, मात्र आता चारा आणि पाण्याअभावी ते विकण्याचा विचार करावा लागत असल्याचे त्याने सांगितले. “आम्ही दोघे भाऊ पैलवान होतो. आमचे घराणे पैलवानकीचे; पण आज गुरांकडे पाहूनच आमची तब्येत घसरली. काय खायचे, हा प्रश्न पडतोय,” असे सांगताना त्याच्या बोलण्यातून हतबलता जाणवत होती.

तीन दिवसांसाठी टँकरवर 1500 रुपये खर्च

गावात पाण्याची परिस्थिती किती गंभीर आहे, हे सांगताना शेतकऱ्याने टँकरच्या खर्चाचा उल्लेख केला. एक टँकर आणण्यासाठी 1500 रुपये मोजावे लागतात आणि हे पाणी अवघे तीन दिवस पुरते, असे त्याने सांगितले. घरातील गरजा, शेती आणि जनावरांची तहान भागवण्यासाठी पाण्याची जुळवाजुळव करताना कुटुंबांची दमछाक होत आहे. 'पाण्याने खूप मोठा धोका दिला ओ सर… आता काय करावं, याची चिंता आहे.' या वाक्याने मानसी नाईकदेखील भावूक झाली.

शेतकऱ्याची व्यथा ऐकून मानसी नाईकलाअश्रू अनावर

या संवादावेळी अभिनेत्री मानसी नाईकही उपस्थित होती. शेतकऱ्याने गोधन सांभाळण्यासाठी केलेले कष्ट, पाण्याची टंचाई आणि जनावरं विकण्याची वेळ आल्याचे सांगितल्यानंतर ती भावुक झाली. संवेदनशील मनामुळे तिलाही आपले अश्रू आवरणं कठीण झालं होतं.

नाईकनगरमध्ये शेतीसोबत मजुरीचाही रोजगार संकटात

सुमारे 200 लोकवस्तीच्या नाईकनगरमध्ये पूर्वी केळी, ऊस आणि कापसाची शेती बहरलेली होती. मात्र, यंदा पाण्याअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले असून रब्बी हंगामाबाबतही अनिश्चितता आहे. गावातील अनेक कुटुंबे शेतमजुरीवर अवलंबून आहेत. शेतात कामच नसेल तर मजुरी कशी मिळणार आणि घरातील चूल कशी पेटणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

दिवाळीचा फराळ, आकाशकंदील आणि आपुलकीचा आधार

शेतकऱ्यांच्या अडचणी दाखवण्याबरोबरच संकटातील कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा वाटा उचलण्याचा निर्णय झी 24 तासने घेतला आहे. ‘उत्सव बांधिलकीचा’ या उपक्रमातून दुष्काळग्रस्त गावांमध्ये दिवाळीचा फराळ, आकाशकंदील आणि कपडे पोहोचवले जात आहेत. नाईकनगरमध्ये शेतकऱ्यांच्या दारात कंदील लावण्यात आला. यावेळी मानसी नाईक यांनी कंदील लावताना मनातील इच्छा व्यक्त करण्याचे आवाहन केले. समृद्धीचे प्रतीक असलेल्या या कंदिलातून शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा आनंद आणि सुबत्ता यावी, अशी इच्छा यावेळी झी 24 तासच्या टीमनं व्यक्त केली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES