लुटमारीच्या उद्देशाने पुणेकर एअर होस्टेसची जंगलात हत्या, पण पती आणि आईला वेगळाच संशय, सोबत असलेल्या मित्रावर गंभीर आरोप
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक खळबळजनक हत्या उघडकीस आली आहे. पुण्याच्या महिलेची लुटमारीच्या उद्देशाने हत्या केली होती.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक बोंडराणी गावाच्या जंगलात पुणेकर महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. मित्रासोबत फिरायला आलेल्या वर्षा तुरकर हिच्यावर लुटारुनं हल्ला करत तिची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर वर्षा तुरकर हिच्या हत्येमागे तिच्याच मित्राचा हात आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी व पतीने केला आहे.
वर्ष तुरकर हिच्या पतीने आणि आईने तिचा मित्र नितेश अग्रवालवर गंभीर आरोप केले आहे. वर्षा ज्या व्यक्तीसोबत फिरायला गेली होती, त्या नितेश अग्रवालला वर्षाने प्लॉट विकून 60 लाख रुपये व्यवसायासाठी दिले होते, अशी माहिती वर्षाच्या आईने दिली आहे. तर ते पैसे परत मागण्यासाठी वर्षाने नितेशला फोन केल्याचे देखील तिच्या आईने सांगितले आहे.
दरम्यान, वर्षाचा पतीनेही मित्र नितेश अग्रवाल याला 15 लाख रुपये दिले होते, असा दावा केला आहे. पोलीस या दाव्याची पडताळणी करत असून नितेशची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसंच, वर्षाच्या बहिणीनेही गंभीर आरोप केले आहेत. लुटमारीच्या उद्देशाने हत्या झाली असेल तर वर्षाच्या हत्येनंतर दागिने शाबूत होते. तसंच, नितेशला कोणतीही इजा झाली नव्हती, असा संशयही कुटुंबाने व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
वर्षा तुरकर या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वारशिवनी तालुक्यातील खिनी-नवेगाव येथील रहिवासी होत्या. वर्षाचे 2019 मध्ये पुण्यातील एका तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. त्या पुण्यातील धनोरी परिसरात राहत होत्या आणि एअर इंडियामध्ये लाईन ऑपरेटर म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पतीची बदली इंदूरला झाली असून, ते सध्या तिथेच कार्यरत आहेत.
वर्षा दिवाळीसाठी आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत माहेरी आल्या होत्या. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास, वर्षा आपल्या मुलीला माहेरी सोडून गोंदियातील मनोहर चौक येथील रहिवासी असलेल्या 41 वर्षीय नितेश अग्रवाल यांच्यासोबत कारमधून तिरोडाकडे निघाल्या. दरम्यान, ते दोघे अर्जुनी-बोंद्रानीजवळ वैनगंगा नदीच्या काठावरील श्रीराम मंदिर परिसराच्या सभोवतालच्या जंगलात पोहोचले.
नितेशने आपली गाडी तिथे पार्क केली आणि जंगलात बसून बोलू लागला. सायंकाळी 5.30 ते 6 च्या सुमारास, तीन अनोळखी माणसे अचानक तिथे आली. नितेश अग्रवालने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तिन्ही आरोपींनी वर्षाला चाकूचा धाक दाखवून लुटले आणि धारदार चाकूने तिच्या पोटात वार केले. यानंतर, तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले
पोलिसांकडून चौकशी सुरू
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा (चौकशी अहवाल) तयार करून, खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. खुनाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे. गोंदियाचे पोलीस अधीक्षक, गोरख भामरे यांनी सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.