नादच खुळा! महाराष्ट्रातील 'या' ग्रामपंचायतीने अख्ख्या गावाला दिला दिवाळी बोनस, देशातील पहिलीच ग्रामपंचायत
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे गाव चर्चेत आहे ते त्यांनी केलेल्या एका उपक्रमामुळं
दिवाळी म्हटलं की बोनस हा आलाच. दिवाळी सुरू होण्याआधी तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून मोठे मोठे गिफ्ट मिळत आहेत. काही जणांना आयफोनही गिफ्ट करण्यात आले आहेत. तर कुठे बॉस कर्मचाऱ्यांना पगाराइतकाच बोनस देतो. मात्र तुम्ही कधी ऐकलंय का ग्रामपंचायतीनेच गावकऱ्यांना बोनस दिल्याचं. पण हे घडलंय आपल्या महाराष्ट्रात.
दिवाळी म्हटलं की नोकरदारांना बोनस मिळतो. मात्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने चक्क संपूर्ण गावालाच दिवाळी बोनस दिलाय. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना. पण हे खरंय. ग्रामपंचायतीने हे कसं करुन दाखवलं, जाणून घेऊयात.
ग्रामपंचायतीने उभारलेल्या निधीतून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम खातेदार ग्रामस्थांना रोख स्वरूपात वाटप करण्यात आली आहे. गावाच्या विकासासाठी लोकसहभागाचा आदर्श निर्माण करणाऱ्या मान्याचीवाडीने आता आर्थिक नियोजनातून ग्रामस्थांची दिवाळीही गोड केली आहे.
भारतातील अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी मान्याचीवाडी ही पहिली ग्रामपंचायत असून या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने शासनाचे तब्बल 83 पुरस्कार मिळवले असून कोट्यावधी रूपयांचे बक्षीसही मिळवले आहे. या बक्षीसांच्या पैशाच्या नियोजनातून व गावकर्यांनी उभारलेल्या निधीतून दिवाळी बोनस देण्यात आला आहे.
अख्ख्या गावाला दिवाळीचा बोनस देणाऱ्या या ग्रामपंचायतीची राज्यभरात चर्चा होतेय. या गावची लोकसंख्या अवघी 420 इतकी आहे तर 98 कुटुंबे राहतात. पाटण तालुक्यातील ही मान्याचीवाडी ग्रामपंचायत म्हणजे ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
2024 मध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोत्तम पंचायतचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या राष्ट्रीय पुरस्कारासोबत गावाला तब्बल 1, 50,00,000 म्हणजेच दीड कोटीचे पारितोषिक मिळाले.