ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शरद पवारांचा पक्ष सहभागी होईल असं सांगितलं जात असतानाच यासाठी आता थेट शरद पवार सक्रीय राजकारणापासून दूर जाणार असल्याची चर्चा आहे. शरद पवारांनी सक्रीय राजकारणामधून निवृत्ती जाहीर करुन पक्षाने भाजपाच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'मध्ये सहभागी व्हावं का यासंदर्भात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत चर्चा सुरु असल्याचं बातमी सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने दिली आहे.
शरद पवारांना निवृत्त करण्याची चर्चा का?
शरद पवारांचा पक्ष 'एनडीए'सोबत जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. प्रसारमाध्यमांमध्ये पडद्यामागील हलचालींसंदर्भात सूत्रांच्या हवाल्याने बातम्या समोर येत असल्याने पवार खरोखरच भाजपासोबत जाणार का याबद्दल तर्क-वितर्क मांडले जात आहे. असं असताना आता शरद पवारांची राजकीय प्रतिमा जपण्याच्या उद्देशाने त्यांच्या निवृत्तीचा विचार पक्षातून सुरु आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस 'एनडीए' सोबत गेल्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार शरद पवार यांनी सोडला, असा संदेश जाण्याची भीती पक्षातून व्यक्त केली जात आहे. तसेच शरद पवार 'जातीयवादी' भाजपसोबत गेले अशी टीका निश्चित होईल, याबद्दलही पवारांच्या पक्षातील अनेक नेत्यांचं एकमत आहे. या टीकेला वाव देण्याची संधीच उपलब्ध न करुन देण्यासाठी आता शरद पवारांच्या निवृत्तीनंतर पक्ष भाजपासोबत जाऊ शकतो का याबद्दलची चाचपणी सुरु असून हा पर्याय चर्चा स्तरावर असल्याचं सांगितलं जातंय.
पवारांनी सोडलेलं अध्यक्षपद, पण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फुटीआधी शरद पवारांनी 2 मे 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला होता. मात्र, या घोषणेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणा मागे घ्यावी अशी जोरदार मागणी केल्याने निवृत्तीच्या घोषणेनंतर अवघ्या तीन दिवसांनी शरद पवारांनी हा निर्णय मागे घेतलेला. हा निर्णय मागे घेताना शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करण्यामागील कारणासंदर्भात बोलताना, पक्षात नवे नेतृत्व तयार व्हायला हवं, अशी इच्छा बोलून दाखवली होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर पुढे वर्षभरामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गट सरकारसोबत गेला आणि पक्षात उभी फूट पडली.
पुढे काय होऊ शकतं?
> शरद पवार 12 डिसेंबर रोजी 86 वर्षांचे होतील. ते राजकारणात सहा दशकांहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदापासून अनेक पदे त्यांनी भूषविली असून वयाच्या या टप्प्यावर भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्यास आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय भूमिकेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.
> शरद पवारांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात त्यांच्यावर भाजपासोबत गेल्यास होणारी संभाव्य टीका टाळायची असेल तर त्यांनी निवृत्ती घ्यावी व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, पक्षातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील या सारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा का? याची सध्या चाचपणी केली जात आहे.
> शरद पवारांच्या निवृत्तीसंदर्भात नेमका निर्णय काय घ्यायचा किंवा पक्षाची प्रतिमा जपत भाजपासोबत कसं जाता येईल याबद्दल अंतिम निर्णय काय असावा हे अद्याप निश्चित झालेलं नाही. भाजपच्या नेतृत्वाशीही पक्षाच्या काही नेत्यांनी या संदर्भात चर्चा केली असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केलेल्या फोन कॉलवर, 'आपण विश्रांती घ्या सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू' असे म्हटले होते. मोदींच्या या विधानावरुन पवार निवृत्त होत असून स्वतः पंतप्रधानांनी संकेत दिल्याचा अर्थ काढला गेला आणि याची बरीच चर्चा झालेली.
शरद पवारांच्या खासदार-आमदारांचं म्हणणं काय?
शरद पवारांच्या पक्षाचे बहुतेक खासदार व आमदार हे 'एनडीए'सोबत जाण्याच्या बाजूने असल्याचे मानले जात आहे. रोहित पवार सोडले तर एकही आमदार या भूमिकेच्या विरोधात नसेल, असेही चित्र सध्या दिसत आहे. शेगाव ते नागपूर अशी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून सध्या रोहित पवार पक्षात एकटे पडल्याचं चित्र दिसत आहे.