SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

...म्हणून शरद पवार निवृत्त होणार? पक्षाचं नेतृत्व 'या' व्यक्तीकडे? मोदींनीच संकेत दिल्याची चर्चा; राजकारण ढवळून निघणार?

शरद पवारांच्या पक्षासंदर्भात मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु असतानाच आता एक नवा फॉर्म्युला समोर येत असून पक्ष एनडीसोबत जाण्याआधीच शरद पवार निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 24, 2026, 10:18 IST | Updated: Nov 24, 2026, 10:35 IST
Image Credit: शरद पवारांच्या निवृत्तीच्या माध्यमातून काय साध्य होणार? (प्रातिनिधिक फोटो)
Join

ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शरद पवारांचा पक्ष सहभागी होईल असं सांगितलं जात असतानाच यासाठी आता थेट शरद पवार सक्रीय राजकारणापासून दूर जाणार असल्याची चर्चा आहे. शरद पवारांनी सक्रीय राजकारणामधून निवृत्ती जाहीर करुन पक्षाने भाजपाच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'मध्ये सहभागी व्हावं का यासंदर्भात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत चर्चा सुरु असल्याचं बातमी सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने दिली आहे.

शरद पवारांना निवृत्त करण्याची चर्चा का?

शरद पवारांचा पक्ष 'एनडीए'सोबत जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. प्रसारमाध्यमांमध्ये पडद्यामागील हलचालींसंदर्भात सूत्रांच्या हवाल्याने बातम्या समोर येत असल्याने पवार खरोखरच भाजपासोबत जाणार का याबद्दल तर्क-वितर्क मांडले जात आहे. असं असताना आता शरद पवारांची राजकीय प्रतिमा जपण्याच्या उद्देशाने त्यांच्या निवृत्तीचा विचार पक्षातून सुरु आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस 'एनडीए' सोबत गेल्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार शरद पवार यांनी सोडला, असा संदेश जाण्याची भीती पक्षातून व्यक्त केली जात आहे. तसेच शरद पवार 'जातीयवादी' भाजपसोबत गेले अशी  टीका निश्चित होईल, याबद्दलही पवारांच्या पक्षातील अनेक नेत्यांचं एकमत आहे. या टीकेला वाव देण्याची संधीच उपलब्ध न करुन देण्यासाठी आता शरद पवारांच्या निवृत्तीनंतर पक्ष भाजपासोबत जाऊ शकतो का याबद्दलची चाचपणी सुरु असून हा पर्याय चर्चा स्तरावर असल्याचं सांगितलं जातंय.

पवारांनी सोडलेलं अध्यक्षपद, पण...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फुटीआधी शरद पवारांनी 2 मे 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला होता. मात्र, या घोषणेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणा मागे घ्यावी अशी जोरदार मागणी केल्याने निवृत्तीच्या घोषणेनंतर अवघ्या तीन दिवसांनी शरद पवारांनी हा निर्णय मागे घेतलेला. हा निर्णय मागे घेताना शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करण्यामागील कारणासंदर्भात बोलताना, पक्षात नवे नेतृत्व तयार व्हायला हवं, अशी इच्छा बोलून दाखवली होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर पुढे वर्षभरामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गट सरकारसोबत गेला आणि पक्षात उभी फूट पडली.

पुढे काय होऊ शकतं?

> शरद पवार 12 डिसेंबर रोजी 86 वर्षांचे होतील. ते राजकारणात सहा दशकांहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदापासून अनेक पदे त्यांनी भूषविली असून वयाच्या या टप्प्यावर भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्यास आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय भूमिकेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.

> शरद पवारांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात त्यांच्यावर भाजपासोबत गेल्यास होणारी संभाव्य टीका टाळायची असेल तर त्यांनी निवृत्ती घ्यावी व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, पक्षातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील या सारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा का? याची सध्या चाचपणी केली जात आहे.

> शरद पवारांच्या निवृत्तीसंदर्भात नेमका निर्णय काय घ्यायचा किंवा पक्षाची प्रतिमा जपत भाजपासोबत कसं जाता येईल याबद्दल अंतिम निर्णय काय असावा हे अद्याप निश्चित झालेलं नाही. भाजपच्या नेतृत्वाशीही पक्षाच्या काही नेत्यांनी या संदर्भात चर्चा केली असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केलेल्या फोन कॉलवर, 'आपण विश्रांती घ्या सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू' असे म्हटले होते. मोदींच्या या विधानावरुन पवार निवृत्त होत असून स्वतः पंतप्रधानांनी संकेत दिल्याचा अर्थ काढला गेला आणि याची बरीच चर्चा झालेली.

शरद पवारांच्या खासदार-आमदारांचं म्हणणं काय?

शरद पवारांच्या पक्षाचे बहुतेक खासदार व आमदार हे 'एनडीए'सोबत जाण्याच्या बाजूने असल्याचे मानले जात आहे. रोहित पवार सोडले तर एकही आमदार या भूमिकेच्या विरोधात नसेल, असेही चित्र सध्या दिसत आहे. शेगाव ते नागपूर अशी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून सध्या रोहित पवार पक्षात एकटे पडल्याचं चित्र दिसत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES