शिर्डी शहरातील दत्तनगर भागात भाडोत्री खोली घेऊन राहणाऱ्या झारखंड येथील चार तरुणांच्या खोलीतून सिल्व्हर फॉईल पेपरमध्ये गुंडाळलेले आयफोन सह विविध नामांकित कंपन्यांचे सुमारे 18 लाख 34 हजार रुपये किमतीचे चोरीचे 55 मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत करण्यात आले आहे. सिमकार्ड सह वेदनाशामक औषधी गोळ्याही तेथे पोलिसांना मिळून आल्या आहेत. पोलिसांनी या खोलीत धाड टाकताच दोन जण मागच्या दरवाजाने अंधाराचा घेऊन पसार झाले आहेत.
रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना शिर्डी शहरातील दत्तनगरमध्ये एका खोलीत भाडोत्री राहत असलेल्या झारखंड येथील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान एका चोरीच्या मोबाईलचे लोकेशन पोलीस ट्रॅक करत होते.
पोलिसांना संबंधित लोकेशन त्याच ठिकाणी ट्रेस होत होते. पोलीस त्या ठिकाणी खात्री करण्यासाठी खोलीकडे गेले असता घराचे मागील बाजूस असलेल्या दरवाजामधून अंधाराचा फायदा घेत दोन तरुण पळून गेले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सापडले नाहीत.
पोलिसांनी खोलीतील एका बॅगेची पाहणी केली असता घरातील त्या बॅगमध्ये सुमारे 18 लाख 34 हजार रुपये किंमतीचे विविध नामांकित कंपन्यांचे 55 मोबाईल मिळून आलेत. हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया शिर्डी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.
मुंबईतील विलेपार्ले परिसरात दिवसाढवळ्या चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कूपर रुग्णालयाच्या मार्गावर दोन तरुणी बस स्टॉपच्या दिशेने जात असताना, त्यांच्या मागून एक तरुण संशयास्पद पद्धतीने चालत येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा तरुण हळूहळू तरुणींच्या जवळ जात त्यांच्या बॅगेची चेन उघडून मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, तरुणींना संशय आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं आणि चोरीचा प्रयत्न त्यांच्या लक्षात आला. यानंतर स्थानिक नागरिकांनी संशयित तरुणाला पकडल्याचं समोर आलं आहे. चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पकडून चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.