सुनील तटकरेंना मोठा धक्का, होमग्राउंडवर राष्ट्रवादीला खिंडार, विश्वासू सहकाऱ्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सुनील तटकरे यांचे होमग्राउंड अशी ओळख असलेल्या रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर, रोहा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सुरेश मगर तसेच आप्पा देशमुख यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
रोह्यातील राम मारुती चौकात पालकमंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमोद म्हसकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. विशेष म्हणजे, सुनील तटकरे यांचे प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या रोह्यातच हा पक्षप्रवेश झाला असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आता शिगेला पोहोचल्याचे म्हटले जाते.
श्रीवर्धनमध्येही राष्ट्रवादीला खिंडार
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या आणखी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. गेली 15 वर्षे श्रीवर्धन तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे दर्शन विचारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. कार्यकर्त्यांच्या या पक्षप्रवेशामुळं श्रीवर्धन शहरासह ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता.
'राष्ट्रवादीशी मैत्री जरा लांबूनच ठेवा'
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र , जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी राष्ट्रवादीशी मैत्री जपताना सावध राहण्याचा सल्ला शिवसेनेच्या नेत्यांना दिला आहे. शेकापची आज झालेली अवस्था पाहता शिवसेनेचा शेकाप होऊ देऊ नका, त्यासाठी राष्ट्रवादीशी संबंध जरा लांबच ठेवा, असे सूचक विधान त्यांनी केले आहे
दरम्यान, माणगावच्या प्रवेश सोहळ्यात शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवर टोकाची टीका केली होती. मात्र आता महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना उदंड आयुष्य लाभो आणि तटकरे 100 वर्ष जगावे, अशा शुभेच्छा दिल्यात. पुढचा प्रवास त्यांनी याची देही याची डोळा अनुभवावा, असं महेंद्र दळवी म्हणालेत. याआधी माणगावच्या सभेत तटकरेंवर बोलताना महेंद्र दळवींची जीभ घसरली होती. त्यानंतर आता त्यांनी तटकरेंना या शुभेच्छा दिल्या आहेत.