प्रवासाचे अंतर कमी व्हावे आणि वेग वाढावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध प्रकल्पाचे आयोजन करण्यात येत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास वेगवान होण्यासाठी तीन नवे बोगदे खोदण्यात येणार आहेत. यामुळं नागरिकांचा मोठा वळसा घालून जाण्याचे कष्ट वाचणार आहेत. तसंच, या प्रकल्पामुळं महाबळेश्वर-तापोळ्याचा कायापालट होणार आहे.
सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगांमधून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी तीन नवीन भुयारी मार्ग अर्थात बोगद्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पोलादपूर-सातारा आणि रघुवीर घाट-सातारा या मार्गांवर बोगदे प्रस्तावित असून, या प्रकल्पांमुळे घाटरस्त्यांवरील अवघड प्रवासाचा त्रास कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
प्रस्तावित तीन मार्गांमध्ये पोलादपूर-जांभळी (वाई), खेड-सातारा आणि मेढा-तापोळा या मार्गांचा समावेश आहे. पोलादपूर येथून वाई तालुक्यातील जांभळीपर्यंत भुयारी मार्ग विकसित करण्याची संकल्पना असून महाबळेश्वरला जोडण्यासाठी स्वतंत्र जोडरस्त्याचाही विचार आहे. दुसऱ्या महत्त्वाच्या खेड-सातारा मार्गासाठी रघुवीर घाट आणि कास पठाराखालून भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. तर तिसऱ्या मार्गात पाचवड-मेढा नवीन माहामार्गाशी जोडून मेढा ते तापोळादरम्यान भुयारी मार्ग विकसित करण्याची संकल्पना आहे.
महाबळेश्वर आणि तापोळा परिसराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी नियोजनामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच तापोळा येथे केबल-स्टेड ब्रिज आणि तापोळा-आपटी पूल उभारण्यात येत असून, पसरणी घाटाचे रुंदीकरणही केले जाणार आहे.
एकूणच, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून होणारी ही बोगद्यांची उभारणी प्रत्यक्षात आल्यास कोकणातील खेड-सातारा हा मार्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील रघुवीर घाट आणि कास पठाराखालून नेण्यात येऊ शकतो. त्यामुळं दळणवळणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.