'मुली मुलांच्या पैशावर प्रेम करतात',इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावर उदय सामंतांची एका कृतीतून प्रतिक्रिया!
इंदुरीकर महाराजांनी मुलींच्या प्रेमाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला. सामंत यांनी हात जोडून थेट भाष्य करणं टाळलं. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज हे आपल्या किर्तनासाठी महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहेत. राज्यासह सोशल मीडियात त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. असे असले तरी ते अनेकदा आपल्या विधानामुळे चर्चेत राहतात. इंदुरीकर महाराज यांनी नुकत्याच केलेल्या मुलींबाबतच्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झालीय. “मुली मुलांवर प्रेम करत नाहीत, तर पैशांवर प्रेम करतात,” असं विधान त्यांनी कीर्तनादरम्यान केलं. या विधानावरून चर्चा सुरू असतानाच मंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. यावर उदय सामंत काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊया.
इंदुरीकर महाराजांचं नेमकं वक्तव्य काय?
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मीरा-भाईंदर परिसरातील एका कीर्तनात प्रेम आणि नातेसंबंधांवर भाष्य केलं. याची चर्चा राज्यभरात झाली. यावेळी त्यांनी मुली मुलांवर प्रेम करत नाहीत, तर पैशांवर प्रेम करतात, असं म्हटलं. तरुणांना उद्देशून त्यांनी हा मुद्दा मांडताना एका मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दाखलाही दिला. यावरुन सोशल मीडियात अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
'लव्ह इज मनी' अशी प्रेमाची व्याख्या
इंदुरीकर महाराजांनी केवळ मुलींच्या प्रेमाबाबत विधान केलं नाही, तर प्रेमाची स्वतःची व्याख्याही सांगितली. “लव्ह इज अ मनी अँड मनी इज अ लव्ह, मनी इज लाइफ अँड लाइफ इज अ मनी,” असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय. प्रेम आणि पैशांची सांगड घालणाऱ्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला योग्य विधान म्हटलंय तर काहींनी याला बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटलंय.
उदय सामंतांना पत्रकारांचा प्रश्न
या वक्तव्यावरून चर्चा सुरू असताना मंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. इंदुरीकर महाराजांच्या विधानाबाबत त्यांची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र सामंत यांनी या विषयावर सविस्तर बोलण्याऐवजी प्रतिक्रिया देणं टाळल्याचं दिसलं.
हात जोडून प्रतिक्रिया; थेट भाष्य टाळलं
पत्रकारांच्या प्रश्नावर उदय सामंत यांनी हात जोडले. कोणतंही स्पष्ट विधान न करता त्यांनी सावध भूमिका घेतली आणि तिथून निघून गेले. त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर सामंत यांचं नेमकं मत काय, याबाबत स्पष्टता आलेली नाही.
इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत
इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर भाष्य करत असतात. असे असताना महिलांबाबतच्या काही विधानांमुळे यापूर्वीही ते चर्चेत आले आहेत. यावेळी मुलींच्या प्रेमाबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वादाची शक्यता आहे. समाजप्रबोधन करताना एखाद्या संपूर्ण वर्गाबाबत अशा प्रकारचं सरसकट विधान करणं योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.