11 वा मजला अन् हॉस्टेल...; दिवाळीत आईचं निधन, अन् 15 दिवसांतच 6 वर्षांच्या लेकाचा मृत्यू, नेमकं घडलं काय?
नायगाव पूर्वेकडील नौकार टॉवर सोसायटीमध्ये अकराव्या मजल्यावरून पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली
आईचा मृत्यू झाला त्यानंतर पंधरा दिवसांतच मुलाचादेखील मृत्यू झाला आहे. वसईच्या नायगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. मिलित कुमार असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो 6 वर्षांचा होता. नायगाव पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिलित कुमारचा इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. दुपारी नवकार टॉवरमधील अकराव्या मजल्यावरील लॉबीमध्ये मिलित एका लहान मुलीसोबत खेळत होता. खेळता खेळता तो खिडकीजवळ गेला. तिथे असलेल्या फर्निचरवर चढला आणि खिडकीवरुन डोकावून बघत असतानाच त्याचा तोल गेला आणि थेट खाली कोसळला.
मिलित थेट अकराव्या मजल्यावरुन खाली पडला तो खाली असलेल्या अग्निशमन यंत्रणेच्या पाइपवर आदळला. त्यामुळं तो गंभीर जखमी झाला होता. त्याला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने वसईतील ग्रेशियस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिलितच्या मृत्यूनंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिलितच्या आईचे अगदी 15 दिवसांपूर्वीच निधन झाले होते. दिवाळीच्याच दिवसांत आईचे निधन झाल्याने कुटुंबांवर दुखःचा डोंगर कोसळला होता. त्या दुखातून सावरत असतानाच मिलितच्या अशा दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वेदनादायक बाब म्हणजे,आईच्या निधनानंतर मुलाला कोण सांभाळणार म्हणून त्याच्या भविष्याचा विचार करुन वडीलांनी त्याला महाबळेश्वरच्या हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी त्याला हॉस्टेलमध्ये पाठवण्याची तयारीदेखील केली होती. मात्र नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी निघालेल्या मिलितच्या आयुष्यावर आदल्याच दिवशी काळा घातला.
या घडलेल्या दुर्घटनेने लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. आणि बिल्डर च्या हलगर्जीपणा वर ही रहिवाशांनी आरोप केला आहे.
वसईच्या भुईगाव डोंगरीत भीषण अपघात
झाडाची फांदी प्रवाशांनी भरलेल्या रिक्षात घुसली दोन ते तिघे जण जखमी वसईच्या भुईगाव डोंगरी परिसरात वडाच्या झाडाची मोठी फांदी अचानक रिक्षावर कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. झाडाची फांदी थेट रिक्षाच्या आतमध्ये घुसल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत रिक्षाचालक आणि रिक्षातील प्रवाशांना दुखापत झाली असून, रस्त्यावरून जाणारा एक पादचारीही या अपघाताच्या तडाख्यात सापडला आहे. या पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.