शासकीय नोकरीला असल्याची थाप मारून लग्न केले. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच पतीचा बनाव उघड झाला. त्यातच स्वयंपाक आणि कपड्यांवरून सासरच्या मंडळींकडून सतत हिणवले जात होते. या सगळ्या मानसिक त्रासातून छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरात एका २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
संजना नीलेश शेजवळ असे मृत विवाहितेचे नाव असून लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. 13 ऑक्टोबर रोजी वानखेडेनगर येथील सासरी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. सासरच्या मंडळींनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
संजनाच्या वडिलांनी पतीने शासकीय नोकरीबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा, तसेच सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
माहेरहून पैसे आणणे, सदनिका नावावर करून देणे आणि घटस्फोटासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आयटी अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची घटना केशवनगर येथे घडली. त्रिष्णा राहुल सकपाळ (वय ३३, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण निकम (वय 74, रा. केशवनगर) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेसासू शकुंतला साळुंके (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, हडपसर) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिष्णा हिचा विवाह 2018 मध्ये राहुल सकपाळ याच्याशी झाला होता.