लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आईला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. हर्सूलच्या पत्थरवाडीत संतापजनक प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर, नराधम मुलाने आईच्या डोक्यात दगड घातल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी 25 वर्षीय मुलगा अमर गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरातील पत्थरवाडीत लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून एका मद्यपी मुलाने जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अमर भाऊसाहेब गायकवाड असे आरोपी मुलाचे नाव असून, त्याने आईच्या डोक्यात दगड घातल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
कालिंदा गायकवाड या फळविक्रीचा व्यवसाय करतात. कामावरून घरी आल्यानंतर त्यांचा मुलगा अमर हा दारू पिऊन घरी आला. कंबर दुखत असल्याचे कारण सांगत त्याने आईला घाटी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार दोघेही रिक्षा पकडण्यासाठी घरासमोरील रस्त्यावर आले असता, अमरने आईचे केस पकडून त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने त्यांच्या डोक्यात दगड घातला.
भांडणाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत कालिंदा यांची सुटका केली. डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने नागरिकांनी रिक्षाची व्यवस्था करून त्यांना हसूल पोलिस ठाण्यात पाठवले. या प्रकरणी अमर गायकवाड याच्याविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. कळंब-येरमाळा मार्गावरील हासेगाव परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे, हत्येपूर्वी आरोपीने पत्नीचा व्हिडिओ चित्रीत करून तो नातेवाईकांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या वेळी चार वर्षांचा चिमुकला घटनास्थळी उपस्थित असल्याचीही माहिती आहे.
गणेश टेकाळे असं आरोपी पतीचं नाव असून, कोमल टेकाळे असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.