छत्रपती संभाजीनगर येथे खळबळजनक घटना
घडली आहे. दांडिया खेळताना वाद झाला आणि या वादातून आठ वर्षांच्या मैत्रीचा शेवट झाला. मित्रानेच मित्राचा निर्घृणपणे खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मैत्रीच्या नावाला काळिमा फासला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगरमध्ये दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आठ वर्षांपासून जिवलग मित्र असलेल्या दोघांमधील मैत्रीचा शेवट रक्तरंजित झाला आहे.
नशेत धुंद असलेल्या मित्रानेच लोखंडी रॉडने डोके, चेहरा आणि मानेवर वार करत दुसऱ्या मित्राचा जीव घेतला. पुष्कर सतीष गाडे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून, महेश पवार उर्फ भोऱ्या असे आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे.
पुष्करचे वडील टेम्पोचालक असून तो आई-वडील आणि बहिणीसोबत संघर्षनगरमध्ये राहत होता. महिनाभरापूर्वीच त्याने एका कपड्याच्या दुकानात नोकरी सुरू केली होती. तर आरोपी महेश मजुरीचे काम करतो. दोघांची आठ वर्षांपासून घट्ट मैत्री होती. मात्र, दांडिया खेळताना झालेल्या वादातून या मैत्रीचा दुर्दैवी अंत झाला.
या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगर परिसरात जुन्या वादातून बाप-लेकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबासाहेब कीर्तिकर आणि त्यांचा मुलगा नेहाल कीर्तिकर अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासांत पाच संशयितांना ताब्यात घेतले. हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे स्टेशन परिसरातून ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.