मानवतेला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. नऊ महिने ज्या गर्भाला पोटात वाढवलं, त्याच अवघ्या एका दिवसाच्या मृत बाळाला शेवटचा हात लावण्यासही आई-वडिलांनी नकार दिला. ज्या हातांनी त्या फुलासारख्या जिवाला कवटाळायला हवं होतं, तेच हात अंधश्रद्धेच्या बुरख्याआड मागे खेचले गेले. नेमकं घडलं काय आणि या बाळावर अंत्यसंस्कार कोणी केले, नक्की या बाळाच्या नातेवाईकांचं म्हणणं काय होतं जाणून घेऊयात...
का हात लावला नाही?
रक्ताचे नातेवाईकच दगडासारखे पाषाणहृदयी बनल्याचे विदारक वास्तव या घटनेच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले आहे. "सध्या नवरात्र सुरू आहे, आमच्यात बाळ बाळंतिणीला हात लावत नाहीत, आम्ही कोणताही विधी करणार नाही," असा असा पवित्रा बाळाच्या वडीलाने घेतला. धर्माच्या आणि रूढी-परंपरेच्या नावाखाली स्वतःच्याच मृत बाळाला विद्रूपपणे नाकारणाऱ्या या आई-वडिलांच्या वृत्तीने उपस्थित डॉक्टरांचेही डोके सुन्न झाले. शेवटी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी हा अंत्यविधी केला.
अंत्यविधी कोणी केले?
या बाळावर स्मशानभूमीमधील कर्मचारी सुनिता गायकवाड आणि त्यांच्या मुलाने अंत्यसंस्कार केले. सुनिता यांनी या बाळाचा एकही नातेवाईक आला नव्हता असं सांगितलं. तसेच माझ्या मुलानेच रुग्णालयामधून फोन आल्यानंतर तिथे जाऊन या बाळाचं पार्थिव ताब्यात घेतलं आणि ते स्मशानभूमीत आणल्याचं सुनिता प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हणाल्या.
अत्यंविधीसंदर्भात स्मशानभूमीतील महिला काय म्हणाली?
सुनिता गायकवाड यांनी, "एक दिवसाचं बाळ होतं. आई, वडील कोणीच त्या बाळाला हात लावत नव्हतं. आम्ही स्वत: त्या बाळाचे अत्यंविधी केले. त्या बाळाचे आई-वडील कोणीच नव्हतं आलं. त्यांना तर दु:खही वाटलं नाही की आपलं बाळ वारलं. आम्ही नवरात्रामध्ये असूनही अत्यंविधी करतो," असं सांगितलं. "करोना काळातही आम्ही अनेक अंत्यविधी केले. पण कालचा प्रकार पाहून अजून माणसाचा अंधश्रद्धेवरील विश्वास गेला नाही, असं वाटलं. नवरात्र आहे म्हणून त्या बाळाच्या घरच्यांनी कोणीच हात लावला नाही. माझ्या मुलाने रुग्णालयात त्या बाळाचं पार्थिव आणून आम्ही इथे अंत्यसंस्कार केले," असं सुनिता यांनी सांगितलं.
"बाळाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, आम्ही बाळाला हात नाही लावू शकत. तुम्ही बाळ आणा आणि त्याचे अत्यंविधी करा. आम्हाला पण दु:ख वाटतं पण आम्ही करतो अंत्यसंस्कार," असं सुनिता यांनी म्हटलं.