इन्स्टाग्रामवर ओळख, प्रेमसंबंध आणि त्यानंतर विवाह मात्र, लग्नानंतर पत्नीचेच अश्लील व्हिडिओ तिच्या आई-वडील आणि बहिणीच्या व्हॉट्सॲपवर पाठवून बदनामी केल्याचा गंभीर प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शारीरिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप विवाहितेने केला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली. पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि यावेळी व्हिडिओ चित्रित केल्याचा आरोप आहे.
11 ऑक्टोबर रोजी दोघांनी लाडगाव येथे हिंदू पद्धतीने विवाह केला. मात्र, त्यानंतर दोघे वेगवेगळे राहत होते. 14 ऑक्टोबर रोजी आरोपीने महिलेचे सिमकार्ड घेतले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे अश्लील व्हिडिओ आणि लग्नाचे फोटो आई-वडील व बहिणीला पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पतीने केलेल्या या घाणेरड्या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. सुरुवातीला वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील खरवड येथे माहेरी का गेलीस? या कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील खरवड गावात संपूर्ण घटना घडली असून पत्नी सासरी न येता माहेरी का गेलीस? या कारणावरून पतीने लाकडाने पत्नीवर वार करत हत्या केली आहे.
तसेच सासूला देखील मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर पतीने देखील स्वतः आत्महत्या केली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.