कैलास गोरंट्याल: जालन्यात नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भजनाच्या कार्यक्रमात भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली. 14 ऑक्टोंबर रोजी रात्री जालना शहरात मंमादेवी मंदिर परिसरात पार पडलेल्या भजन कार्यक्रमांमध्ये ही नोटांची उधळण करण्यात आली. भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी रात्री शहरातील मंमादेवीच्या भजन कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून ठेका धरला. भर दुष्काळात गोरंटयाल यांच्यावर त्यांच्याच समर्थक नगरसेवकाने पैशाचा पाऊस पाडला.
जालन्यातील भाजपचे नेते आणि माजी आमदार असलेल्या कैलास गोरंट्याल यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नागरीकांसाठी नवीन नाही. गोरंट्याल कुणाच्या लग्नात, गणपती उत्सवात आणि नवरात्र उत्सवात डान्स करतानाचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. यंदाही गोरंटयाल यांचे असेच डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले.
दरम्यान काल जालना शहरातील मम्मादेवी परीसरात एका भजन कार्यक्रमात गोरंटयाल यांनी डान्स केला. या डान्सवेळी गोरंट्याल समर्थक असलेल्या नगरसेवक महावीर ढक्का यांनी भर दुष्काळात गोरंटयाल यांच्यावर पैशाचा पाऊस पाडला. ढक्का यांनी 500 रुपयांच्या नोटांची गोरंट्याल यांच्यावर उधळण केली.ढक्का यांच्या या कृत्यामुळे शहरात त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आणि राज्यात एका बाजूला महाभयंकर दुष्काळ असताना भाजप नगरसेवक असलेल्या महावीर ढक्का यांनी गोरंट्याल यांच्यावर पैशांची उधळण केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.
मात्र, या प्रकरणावर ढक्का यांनी प्रतिक्रिया दिली नसली तरी गोरंट्याल यांनी मात्र प्रतिक्रिया दिली. देवाकडे शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली, भजनामध्ये माणूस मंत्रमुग्ध होतो, तेव्हा कोण काय करतो माहित पडत नाही असे स्पष्टीकरण भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी देत या प्रकरणावर सारवा सारव केली आहे.
दरम्यान ही प्रतिक्रिया दिल्यानंतर गोरंटयाल यांनी आणखी एक प्रतिक्रिया या प्रकरणावर दिली. मी नाचत असताना उडवलेले पैसे केवळ 5 ते 10 हजार रुपये होते. हे शगुणचे पैसे असल्याचं गोरंटयाल यांनी म्हटलं.