नांदेड शहरात सिडको परिसरातील स्मशानभूमीत राहणाऱ्या म्हसनजोगी समाजातील एका कुटुंबाने आर्थिक चणचणीमुळे आपल्या लाडक्या लेकीचा साखरपुडा चक्क स्मशानभूमीतच पार पाडला. अंत्यसंस्काराच्या या भूमीवर एका नव्या आयुष्याची स्वप्नं पाहणाऱ्या या कुटुंबाची ही व्यथा सुन्न करणारी आहे.
नांदेडच्या सिडको भागातील स्मशानभूमीत पार पडलेला अक्षरा आणि गोविंद यांचा हा साखरपुडा सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा आणि हळहळीचा विषय ठरलाय. पवार कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून याच स्मशानभूमीत राहून आपला उदरनिर्वाह करतं. मुलीच्या साखरपुड्यासाठी एखादं मंगल कार्यालय भाड्याने घेणं तर दूरच, पण साधं मंडप टाकण्याइतपतही पैसे या कुटुंबाकडे नव्हते. अखेर, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या माता-पित्याने आपल्या काळजाच्या तुकड्याचा अक्षराचा साखरपुडा, आपण जिथे राहतो त्याच स्मशानभूमीच्या आवारात करण्याचा काळीज घट्ट करणारा निर्णय घेतला. अत्यंत साधेपणाने नातेवाईकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. जिथे आयुष्याचा शेवट होतो, त्याच ठिकाणी या तरुण जोडप्याने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांकडून जे काही चार पैसे मिळतात, त्यावरच पवार कुटुंबाची चूल पेटते. लेकीचं लग्न थाटामाटात व्हावं, असं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. मात्र, खिशात दमडीही नसल्याने नाईलाजाने स्मशानभूमीत साखरपुडा उरकावा लागल्याची खंत मुलीच्या आई-वडिलांनी बोलून दाखवली. त्यांच्या डोळ्यांतील हे अश्रू व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारतायत.
या घटनेमुळे भटक्या आणि विमुक्त असलेल्या म्हसनजोगी समाजाचं विदारक दारिद्र्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. शासनाच्या कोट्यवधींच्या योजना नेमक्या कोणासाठी? असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. साखरपुडा तर नाईलाजाने स्मशानभूमीत झाला, पण निदान या लेकीचं लग्न तरी सन्मानाने एखाद्या मंगल कार्यालयात व्हावं, यासाठी शासन आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, अशी आर्त हाक आता नांदेडकर देत आहेत....