एका लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नात नवरेदवाने घातलेल्या हाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या हारात इतकं काय नवल असा विचार तुम्ही करत असाल, तर हा हार काही साधासुधा नाही तर 1 कोटींचा आहे. नवरदेवाला चक्क एक कोटींच्या नोटांचा हार घालण्यात आला होता. यासाठी 500 रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला होता. बरं हे एका नाही दोन नवरदेवांच्या गळ्यात म्हणजे 1 कोटींचे प्रत्येकी दोन हार होते. यामुळे लग्नातील पाहुण्यांचे डोळेही विस्फारले होते. नवरीमुलीच्या भावाने हे लग्न विशेष करण्यासाठी होणाऱ्या भावोजींना हे हार घातले होते. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे हा विवाहसोहळा पार पडला. मात्र आता संपूर्ण देशात चर्चेत आहे.
ही घटना मथुरा येथील सुरीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नगला फोंडा गावातील आहे. प्रशांत आणि कान्हा राघव हे दोन्ही नवरदेव योगेंद्र सिंग आणि कुशलपाल सिंग यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे लग्न गोवर्धन येथील मुदसेरस गावातील दोन मुलींशी ठरले होते.
शनिवारी पार पडलेल्या पारंपरिक 'घुडचढी' (वराची घोड्यावरून काढली जाणारी मिरवणूक) विधीदरम्यान, राजस्थानमधील कामन भागातील नंदोला गावचे रहिवासी आणि त्यांचे मेहुणे योगेश कुमार (ज्याला 'भुरा ठाकूर' असेही म्हणतात) यांनी त्यांना एक अनपेक्षित आणि अनोखी भेट देऊन सर्वांना चकित केले.
During a wedding procession in Mathura, the bride’s brother put a 100-foot-long garland made of ₹1 crore notes on the groom. https://t.co/XG8D2KXBfY
— Harpreet Sandhu (@TheHarpreetTake) November 23, 2026
मेहुण्याने 500 रुपयांच्या नोटांपासून बनवलेला एक अवाढव्य हार नवरदेवांना भेट दिला. हे हार सुमारे 100 फूट लांब असून, प्रत्येकामध्ये जवळपास 1 कोटींच्या नोटा होत्या. हे हार इतके मोठे आणि वजनदार होते की, अनेक लोकांची मदत घ्यावी लागली. दोन्ही वरांना छतावर उभे करण्यात आले आणि त्यांच्या गळ्यात हे अवाढव्य हार घालण्यात आले.
या अनोख्या विवाह सोहळ्याने पाहुणे आणि गावकरी थक्क झाले. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला. या मिरवणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, मेहुण्याने भावोजींनी उधळलेल्या पैशांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कोट्यवधी रुपयांचे हार घातलेले दोन्ही नवरदेव सध्या या भागात चर्चेचा विषय ठरले असून, त्यांचे व्हिडिओ ऑनलाइन माध्यमांवरही मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधून घेत आहेत.