देशातील तीन मोठ्या बँकांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाची माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय या तीन बँकांना आरबीआयने पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बँका म्हणून घोषित केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत या तिन्ही बँकांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे. या बँकांच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात ग्राहक, उद्योग आणि वित्तीय व्यवहार अवलंबून असल्याने त्यांच्यासाठी अतिरिक्त भांडवल राखण्याचे नियम लागू आहेत. याचा सामान्य खातेदारांवर नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेऊया.
आरबीआयच्या 2026 च्या यादीत एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या तीन बँकांचा समावेश आहे. या बँकांना डोमॅस्टिक सिस्टेमॅटीकली इम्पॉर्ट्स बँक्स म्हणजेच देशांतर्गत व्यवस्थात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या बँका म्हटले जाते. या बँकांचे देशातील बँकिंग व्यवस्थेतील स्थान मोठे असल्याने त्यांच्या कामकाजात गंभीर अडचण निर्माण झाल्यास त्याचे परिणाम केवळ संबंधित बँकेपुरते मर्यादित राहतीलच असे नाही. इतर वित्तीय संस्था आणि अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
डी-एसआयबी बँकांना अनेकदा टू बिग टू फेल असे संबोधले जाते. याचा अर्थ या बँका कधीच बुडणार नाहीत, असा होत नाही. तर अशा बँकेच्या अपयशामुळे संपूर्ण वित्तीय व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी आरबीआय अधिक कडक भांडवली निकष लागू करते. बँकेचा आकार, वित्तीय व्यवस्थेतील परस्परावलंबित्व आणि तिच्या सेवा बदलून देण्याची उपलब्धता अशा घटकांचा विचार करून बँकेचे महत्त्व ठरवले जाते.
आरबीआयने या बँकांना वेगवेगळ्या बकेटमध्ये ठेवले आहे. त्यानुसार अतिरिक्त कॉमन इक्विटी टियर-१ (CET1) भांडवल राखण्याची अट लागू आहे.
एसबीआय – बकेट 4 : जोखीम-भारित मालमत्तेच्या 0.80 टक्के अतिरिक्त भांडवल. एचडीएफसी बँक – बकेट 2 : 0.40 टक्के अतिरिक्त भांडवल. आयसीआयसीआय – बकेट 1 : 020 टक्के अतिरिक्त भांडवल ही तरतूद कॅपिटल कन्झर्व्हेशन बफरच्या व्यतिरिक्त आहे. म्हणजेच आर्थिक संकट किंवा संभाव्य नुकसानाचा सामना करण्यासाठी बँकांकडे अधिक भांडवली आधार उपलब्ध राहतो.
RBI ने 2015 मध्ये एसबीआयला डी-एसआयबी म्हणून घोषित केले. त्यानंतर 2016 मध्ये आयसीआयसीआय आणि 2017 मध्ये एचडीएफसी बँकचा या यादीत समावेश झाला. 2026 ची यादी 31 मार्च 2026 पर्यंत बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. यंदाही या तिन्ही बँकांची बकेटमधील स्थिती 2025 च्या यादीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे.
या यादीत एखाद्या बँकेचा समावेश झाला म्हणजे ती बँक आर्थिक संकटात आहे, असा अर्थ होत नाही. तसेच ग्राहकांच्या बचत खात्यातील पैसे, ठेवी किंवा व्यवहारांवर या वर्गीकरणामुळे थेट कोणताही बदल होत नाही. उलट, बँकांकडे अतिरिक्त भांडवल राखण्याची अट असल्याने संभाव्य आर्थिक धक्के सहन करण्याची क्षमता वाढवण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातही एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या बँकांचे मोठे ग्राहकवर्ग आणि शाखांचे जाळे आहे. त्यामुळे या निर्णयाचा उद्देश ग्राहकांमध्ये भीती निर्माण करणे नसून देशाच्या बँकिंग व्यवस्थेची स्थिरता मजबूत ठेवणे हा आहे.