राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला, तरी अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली-कादवी येथे 45 वर्षीय शेतकरी दिगंबर अरुणराव वाघ यांचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. दिगंबर वाघ यांच्याकडे पाच एकर शेती असून, त्यांच्यावर सहकारी बँकेचे सुमारे दीड लाख रुपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली-कादवी येथील शेतकरी दिगंबर अरुणराव वाघ यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मृतदेह बाहेर काढून तो मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दिगंबर वाघ यांच्याकडे पाच एकर शेती होती. त्यांच्यावर सहकारी बँकेचे सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, कर्जामुळेच त्यांनी आत्महत्या केली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे चिखली-कादवी परिसरात शोककळा पसरली आहे,
लातूरच्या जोडवाडीत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर जिल्ह्यात दुष्काळाचं संकट गडद होत असताना शेतकरी आत्महत्येची आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यातील जोडवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन नागोराव देमगुंडे यांनी नापिकी आणि आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. अवघी एक एकर जमीन, डोक्यावर बँकेचं कर्ज आणि उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम, दुष्काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेतून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.