हिंगोलीत पेट्रोल पंपावर इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. पेट्रोल पंप सील करण्यासाठी हा अधिकारी आला होता. यावेळी झालेल्या वादातून 'इंडियन ऑइल'च्या अधिकाऱ्याची कथितरीत्या धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. महेश शेळके अशी या अधिकाऱ्याची ओळख पटली आहे. ते इंडियन ऑइल कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर होते.
पेट्रोल पंप चालकाच्या मुलाने वादावादीनंतर सात वेळा चाकूने वार केले. तांत्रिक कारणांमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला चोंधी येथील इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप सील करण्यासाठी शेळके आणि त्यांचे पथक मंगळवारी सायंकाळी तिथे पोहोचले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पेट्रोल पंप चालक साहेबराव पांडववीर यांच्या कुटुंबीयांनी कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. परंतु अधिकाऱ्यांनी ती विनंती फेटाळून लावली. त्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि याचदरम्यान चालक पांडववीर यांचा मुलगा उमेश पांडववीर याने शेळके यांच्यावर चाकूने सात वार केले. पोट, पाठ आणि चेहऱ्यावर जखमा झाल्यामुळे शेळके जमिनीवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. आरोपी आणि इतरजण दोन गाड्यांमधून घटनास्थळावरून पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
कुरंदा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना आणि आरोपींवर कारवाईची मागणी करताना, इंडियन ऑइलचे अध्यक्ष अरविंदर सिंग साहनी यांनी सांगितले की, शेळके यांच्यावर त्यांचे अधिकृत कर्तव्य बजावत असताना हा हल्ला करण्यात आला.
Deeply anguished by the tragic loss of our colleague, Shri Mahesh Shelke, who was fatally attacked while discharging his official duties in Hingoli, Maharashtra. I strongly condemn this heinous act. We have taken up the matter with the highest authorities in Maharashtra, seeking swift and stringent action against those responsible. IndianOil stands firmly with Shri Shelke’s family in this hour of immense grief. My heartfelt condolences to his family, colleagues and loved ones. @HardeepSPuri @PetroleumMin @Secretary_MoPNG @neerajmittalias @sahneyas @IndianOilcl
— ChairmanIOC (@ChairmanIOCL) October 7, 2026
"महाराष्ट्रातील हिंगोली येथे आपले कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ल्यात बळी पडलेले आमचे सहकारी श्री. महेश शेळके यांच्या दुर्दैवी निधनामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. मी या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध करतो. या प्रकरणी दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. या अत्यंत कठीण प्रसंगी 'इंडियन ऑईल' श्री. शेळके यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांचे कुटुंब, सहकारी आणि आप्तेष्टांच्या प्रति मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो," असे ते म्हणाले.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या हत्येचा निषेध केला. "महाराष्ट्रात कर्तव्य बजावत असताना 'इंडियन ऑईल'चे व्यवस्थापक (रिटेल सेल्स) श्री. महेश शेळके यांचा बळी घेणाऱ्या या दुर्दैवी घटनेमुळे मला अत्यंत दुःख आणि धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील 'इंडियन ऑईल'चे एक रिटेल आउटलेट ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या पथकाचा ते भाग होते; त्यावेळी त्यांच्यावर धारदार शस्त्राने क्रूर हल्ला करण्यात आला. हिंसेच्या या घृणास्पद आणि अस्वीकार्य कृत्याचा मी तीव्र निषेध करतो," असे पुरी म्हणाले.
Deeply saddened and shocked by the tragic incident in which Shri Mahesh Shelke, Manager (Retail Sales), IndianOil, lost his life in Maharashtra while discharging his official duties. He was a part of a team carrying out the takeover of an IndianOil retail outlet in Hingoli district when he was brutally attacked with a sharp weapon. I strongly condemn this heinous and unacceptable act of violence. I offer my heartfelt condolences to the bereaved family in their hour of unimaginable grief and shock. @PetroleumMin and @IndianOilcl firmly stand with them and will extend all possible support. The issue has been taken up with the senior-most officials of the Maharashtra Government and Police to ensure swift and strict action against those responsible, in accordance with law. The safety, dignity and security of our energy-sector personnel, who work tirelessly to serve the nation, remain paramount. May the departed soul rest in peace. Om Shanti. 🙏
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) October 7, 2026
"कायद्यानुसार दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. देशाची सेवा करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमच्या ऊर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि सुरक्षा ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे," असेही मंत्र्यांनी नमूद केले.