शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले अन् मला...; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले 'श्रीकांत शिंदेंनी माझ्याकडे...', कोण कोणाचा गेम करतंय?
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याचं सांगितलं आहे असा दावा त्यांनी केला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याचं सांगितलं आहे असा दावा त्यांनी केला. यासंदर्भात एकनाथ शिंदेंना आज दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळापर्यंत याचं उत्तर द्यावं असंही ते म्हणाले आहेत. भाजपा एकनाथ शिंदेंना संपवायला निघाली आहे की, ते मला संपवत आहेत याचं उत्तर मिळालं पाहिजे असंही त्यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात म्हटलं आहे. आपल्याकडे पुरावा असून, तो लवकरच सादर करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
'एकनाथ शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले....'
"मी टीका किंवा बदनामी करत नसून, फक्त एकनाथ शिंदे यांच्यकडून उत्तर मागत आहे. आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत याचं उत्तर त्यांनी द्यावं. एकनाथ शिंदे तुम्ही भाजपाच्या लोकांना असं सांगितलं आहे का, की मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत. तुम्ही भाजपाकडून 500 कोटी घेऊन मला दिले आहेत असं भाजपाच्या नेत्याला सांगितलं का? कारण ते नेते कुजबुज करु लागले आहेत की, मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदेंच्या हातून 500 कोटी पोहोचले आहेत. जरांगे पाटील आपले थर्ड पर्सन आहेत असं तुम्ही भाजपाला सांगितलं का? तुम्ही जर मला 500 कोटी दिले नसतील तर भाजपा नेमकं तुम्हाला संपवत आहे की तुमही मला याचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
'माझ्याकडे पुरावा असून, तो समोर आणणार'
पुढे ते म्हणाले की, "'मी सोडणार नाही. भाजपात अंतर्गत चर्चा सुरु आहे. पण मनोज जरांगे सोपा नाही. मी मुळात हात घातला आहे. चर्चा कोणाच्यात झाली याचे पुरावे द्या असं सांगितलं आहे. माझ्याकडे पुरावा असून, तो समोर आणणार आहे. शिंदे भाजपाला खोटं बोलले आहेत. त्यांच्याकडून 500 कोटी घेऊन मला दिले सांगितलं. मग 500 कोटी कुठे आहेत? मी 5 हजारांचा गठ्ठाही बघितलेला नाही. शिंदेजी, हे जर खोटं असेल तर दिलखुलास सांगावं. मग मी त्यांच्याकडे पाहतो. खरं असेल तर तसंही सांगावं, की माझ्या मुलाच्या हातून 500 कोटी दिले".
'भाजपा अंस सांगून तुम्हाला संपवत आहे की, तुम्ही मला संपवत आहात?'
"माझ्या मराठ्यांची तेवढी पाकिटं गेली असतील. 3 ते 4 हजार कोटींची फक्त फुलं टाकली असतील. उद्या जर प्रत्येक मराठ्याने 100 रुपये द्या असं सांगितलं तर अडीच हजार कोटी रुपये होतील. हा लहान विषय नाही. तुमचा आमचा सामना तीन महिन्यानंतर होईल. भाजपा अंस सांगून तुम्हाला संपवत आहे की, तुम्ही मला संपवत आहात? हा खूप मोठा कट आहे. पुरावा इतका मोठा आहे की, पायाखालची जमीन सरकेल," असंही ते म्हणाले आहेत.