जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपहरण नाट्यात नवा ट्विस्ट! सहकार मंत्र्याना पळवून नेण्याचा डाव असल्याचा अमित देशमुखांचा खळबळजनक दावा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपहरण नाट्याचा नवा ट्विस्ट आला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही पळवून नेण्याचा डाव होता असा खळबळजनक दावा आमदार अमित देशमुख यांनी केला आहे.
लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास उरलेत. मात्र मतदानाआधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा दावा समोर आला आहे. आमदार अमित देशमुख यांनी केलेल्या एका दाव्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संघर्षाला नवं वळण मिळाले आहे. विरोधकांचा नेमका कोणता डाव होता? सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याबाबत अमित देशमुख यांनी काय दावा केला आहे. भाजपकडून या आरोपांना उत्तर देण्यात आले आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपने यावेळी जंग जंग पछाडल आहे. आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय, तर भाजपकडून अरविंद पाटील निलंगेकर यांनीही विजयासाठी ताकद पणाला लावलीय. विशेष म्हणजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हेही काँग्रेस विचाराच्या सहकार पॅनलमध्ये सहभागी झाल्याने या निवडणुकीची रंगत आणखी वाढली.
अशातच निलंगा येथील मतदाराच्या अपहरणाचा प्रकार समोर आला आणि राजकीय संघर्षाला वेगळंच वळण मिळालं. याच प्रकरणावर बोलताना अमित देशमुख यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाच पळवून नेण्याचा विरोधकांचा डाव होता. त्यासाठी रीतसर आराखडाही तयार करण्यात आला होता. असा खळबळजनक दावा हि आमदार अमित देशमुख यांनी केलाय. अमित देशमुख यांच्या या दाव्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संघर्षाला नवं वळण मिळाले.
आमदार अमित देशमुख यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत अमित देशमुख यांनी निवडणुकीसाठी स्टंटबाजी करू नये. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुरतं राजकारण न करता बँकेच्या मूळ प्रश्नांवर बोलावं, असा पलटवार निलंगेकर यांनी केला. त्यामुळे मतदानाआधीच दोन्ही बाजूंमधील आरोप-प्रत्यारोपांना धार आली.
एकीकडे जिल्हा बँकेची सत्ता मिळवण्यासाठी प्रतिष्ठेची लढाई दुसरीकडे अपहरणाच्या आरोपांवरून पेटलेला राजकीय संघर्ष आणि त्यातच सहकार मंत्र्यांनाच पळवून नेण्याचा डाव असल्याचा दावा. यामुळे मतदानाआधी जिल्ह्याच्या राजकारणात वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांचा मतदानावर किती परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..