छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातून आई-वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका निर्दयी दांपत्याने स्वतःच्या अवघ्या एका महिन्याच्या चिमुकल्याला तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने पावले उचलत एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. यात 12 वी नापास असलेल्या एका बोगस डॉक्टरसह एकूण ७ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना, जाणून घ्या.
रक्ताचा सौदा करणारे गजाआड
स्वतःच्या मौजमजेसाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी जन्मादात्यांनीच पोटच्या गोळ्याचा सौदा केल्याची क्रूर घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. नात्याची सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या या दांपत्याने अवघ्या 30 दिवसांच्या बाळाची विक्री केली. संतापाची बाब म्हणजे बाळाला विकून मिळालेल्या 1 लाख 20 हजार रुपयांमधून या निर्दयी आई-वडिलांनी 25 हजारांचा नवीन स्मार्टफोन आणि 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले.. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपींकडून खरेदी केलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल जप्त केला आहे. गरिबीचे कारण पुढे करत स्वतःच्याच रक्ताचा असा सौदा करणाऱ्या या दांपत्याच्या कृत्याने संपूर्ण संभाजीनगर सुन्न झाले आहे
या निष्पाप प्राणाचा हा व्यापार इथेच थांबला नाही. मध्यस्थांच्या जाळ्यात अडकून या अवघ्या एका महिन्याच्या बाळाची तब्बल 3वेळा खरेदी-विक्री करण्यात आली
पहिली विक्री: मुख्य मध्यस्थ सीमा रेशवाल हिने बाळाचा ताबा घेऊन पडगाव येथील संगीता आव्हाड हिला 2 लाख 70 हजार रुपयांत बाळ विकले
दुसरी विक्री: संगीताने थेट नांदेड गाठून तेलंगणातील पिंपेरला येथील सुरेश गुंटुका या 12 वी फेल बोगस डॉक्टरला 3 लाख 50 हजारांत बाळाचा ताबा दिला
तिसरी विक्री: या बोगस डॉक्टरने हैदराबाद येथील उमा खटकम या नातेवाईक महिलेला हे बाळ साडेतीन लाखांत सोपवले. अशा प्रकारे पैशांच्या लालसेने एका निष्पाप जिवाची वेगवेगळ्या राज्यांत टप्प्याटप्प्याने दलाली करण्यात आली.
स्वतःच्या सुखासाठी आणि मौजमजेसाठी स्वतःच्याच पोटच्या गोळ्याचा सौदा करणाऱ्या अशा जन्मादात्यांना आई-बाप तरी कसे म्हणायचे, पैशांच्या मोहापायी एका निष्पाप जिवाचा लिलाव मांडणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा होणार का, स्वतःच्या अंगावर खेळणाऱ्या बाळाला विकून ज्या आईला दागिन्यांची आणि मोबाईलची हौस फेडावीशी वाटते, अशा क्रूर मनाच्या आईवर संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे