औरंगाबादचं नाव औरंगाबादच राहावं, आणि पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करावं; सुजात आंबेडकरांची मागणी
औरंगाबादचं नाव औरंगाबादच असायला पाहिजे असं विधान सुजात आंबेडकरांनी केलं आहे.
सुजात आंबेडकरांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. औरंगाबादचं नाव औरंगाबादच असायला पाहिजे असं विधान सुजात आंबेडकरांनी केलं आहे. तसंच पुण्याचे नामांतर करत छत्रपती संभाजीनगर नाव द्यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान सुजात आंबेडकरांनी प्रसिद्धीसाठी विधान केल्याचं म्हणत संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तर नवनाथ बन यांनीही सुजात आंबेडकरांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर...एका शहराचं नाव इतिहासाची ओळख बनतं. आणि त्याच नावावरून राजकारणही तापतं. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. औरंगाबादचं नाव औरंगाबादच राहावं आणि पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करावं. अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली आहे.
ज्या शहरात एखाद्या राजाची राजधानी होती आणि जिथून त्याने राज्य केलं त्या शहराशीच त्याची ओळख जोडली गेली पाहिजे असा तर्क सुजात आंबेडकर यांनी मांडला. सुजात आंबेडकर यांनी आपल्या भूमिकेवरून पुण्यातील सामाजिक घटकांवरही सवाल केला. पुण्याला संभाजी महाराजांचं नाव दिलं तर ते संबंधितांना मान्य होईल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, "दोन मिनिटांसाठी छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद हे विसरून जा. आपल्याला एखाद्या राजाचा आदर्श करायचा एखाद्या राजाची इज्जत करायची, आपल्याला एका राज्याची शान ठेवायची. तर तुम्ही कुठल्या शहराचं नाव या राजाच्या मागे ठेवणार, ज्या शहरांमध्ये त्या राजाची राजधानी होती आणि जिकडे त्यांनी राज्य केलं होतं. का ज्या शहरात त्यांना पकडलं होतं आणि छळ केला होता. जिकडे एका राज्याची राजधानी होती, तीच त्या राजाची शान आहे.औरंगाबादचे नावे औरंगाबाद राहिलं पाहिजे आणि पुण्याचं नाव हे छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे. पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या आणि पुण्याचे नाव छत्रपती संभाजी नगर करा".
दरम्यान या भूमिकेवरून आता विरोधी प्रतिक्रिया समोर येत आहेत. संदीप देशपांडे यांनी सुजात आंबेडकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलाय. प्रसिद्धीसाठी वेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. अशी टीका देशपांडे यांनी केलीय. नवनाथ बन यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर म्हणून स्वीकारण्याची भूमिका मांडली. संभाजी महाराजांवरील अत्याचाराचा संदर्भ देत... त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेबाच्या कबरीवरील फुलं वाहण्याच्या कृतीचाही उल्लेख केला.
आनंद दवे यांनीही सुजात आंबेडकरांना सवाल केला. पुण्याचं नाव संभाजीनगर झालं आणि ते सर्वांना मान्य असेल तर आनंदच आहे. पण संभाजीनगरचं नाव पुन्हा औरंगाबाद करण्याचा आग्रह का? असा सवाल त्यांनी केला. संभाजी महाराजांच्या नावावरून सुरू झालेल्या या चर्चेला आता राजकीय प्रतिक्रियांची किनार मिळालीय. त्यामुळे नामांतराचा हा वाद पुढे कोणतं वळण घेतो... याकडे आता लक्ष लागलंय..