SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल

डिलिमिटेशन विधेयकावरुन सध्या देशात राजकारण तापलं असताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेऊन डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. आता त्याविरोधात महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला आहे. यासह महाराष्ट्र, देश आणि विदेशातील प्रत्येक घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 29, 2026, 15:11 IST | Updated: Nov 29, 2026, 21:07 IST
Image Credit: दिवसभरातील वेगवान घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर
Join

Maharashtra Breaking News Today LIVE 29 December 2026 : डिलिमिटेशन विधेयक सोमवारी 30 नोव्हेंबर 2026 रोजी संसदेत मांडलं जाणार आहे. याच डिलिमिटेशन विधेयकावरुन सध्या देशात राजकारण पेटलं असून शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेऊन डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. या विधेयकावरून काँग्रेसने  शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यानंतर आता रविवारी उद्धव ठाकरे सुद्धा यासंदर्भात आपली भूमिका मांडणार आहेत. यासह देश, विदेश, राज्य आणि तुमच्या शहरातील प्रत्येक घडामोडीचा आढावा घ्या एका क्लिकवर...

29 Nov 2026 21:07 IST

इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल

इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल झाले असून ते सांताक्रुज विमानतळावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते ब्रीच कॅन्डी रुग्णालयकडे रवाना होणार आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख व इतर काँग्रेसचे नेते सांताक्रुज विमानतळावर उपस्थित आहेत. शरद पवारांच्या सोबतच्या बैठकीत काय होणार आणि विधेयकाबाबत पवारांच्या भूमिकेत बदल होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

29 Nov 2026 18:26 IST

डिलिमिटेशनचा फायदा केवळ एका राजकीय पक्षाला होणार, अभिजीत दिपकेंचा आरोप

सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आज हिंगोली जिल्ह्याचा दौरा करत दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी मारोती फाळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. दुष्काळी परिस्थिती आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मारोती फाळके यांनी आत्महत्या केली होती. या घटनेला चार ते पाच महिने उलटूनही प्रशासनाला याची माहिती नसल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. तसेच सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत, सरकारमधील मंत्र्यांनी पाच हजार रुपयांत स्वतःची दिवाळी साजरी करून दाखवावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.दरम्यान, देशातील मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरही अभिजीत दिपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. डिलिमिटेशनला आमचा विरोध असून सर्व विरोधी पक्षांनी याला विरोध केला पाहिजे, असं ते म्हणाले. डिलिमिटेशनमुळे मतदारांची संख्या कितीही वाढली तरी त्याचा विशेष फरक पडणार नाही, तर याचा फायदा केवळ एका राजकीय पक्षाला होणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच डिलिमिटेशनची प्रक्रिया मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या देखरेखीखाली होणार असल्याचे सांगत त्यांनी हिंगोलीत माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

29 Nov 2026 18:26 IST

कशेडी बोगद्यात ट्रक जळून खाक

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यात इलेक्ट्रिक सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. मुंबईहून गोव्याच्या दिशेने हा ट्रक जात असताना बोगद्यात अचानक आग लागली. आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेमुळे कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 

29 Nov 2026 17:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप संसदीय पक्षाच्या कार्यकारी समितीसोबत बैठक पार पडली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप संसदीय पक्षाच्या कार्यकारी समितीसोबत बैठक पार पडली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक पार पडली असून  विविध विषयांवर सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाल्याचे मोदींनी एक्स पोस्टमध्ये सांगितले. महाराष्ट्रातील खासदार अनिल बोंडे, मेधा कुलकर्णी, स्मिता वाघ बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू बैठकीला उपस्थित होते. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा झाली. डिलिमिटेशन विधेयक पारित करण्यासंबंधी चर्चा झाली अशी माहिती आहे. 

29 Nov 2026 17:13 IST

नागपुरात एमडी ड्रग्स तस्करी करणाऱ्या आरोपीवर नंदनवन पोलिसाची कारवाई

नागपुरात एमडी ड्रग्स तस्करी करणाऱ्या आरोपीवर नंदनवन पोलिसाची कारवाई केली आहे. एलआयसी क्वार्टरसमोर तपासादरम्यान दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या जवळून ३२.३३ ग्रॅम एमडी सदृश पावडर जप्त करण्यात आली. आरोपी राकेश रमेश वानखेडे याच्यावर २६, तर हर्षल अरुण खडतकर याच्यावर ३ गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती आहे. आरोपीकडून एमडी सदृश पावडर, दुचाकी, मोबाईल, सिरिंज, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ८९ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून, ड्रग्सचा पुरवठा आणि नेटवर्कचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

29 Nov 2026 17:11 IST

राष्ट्रवादी शरद पवार यांच्या खासदारांची उद्या दिल्लीत बैठक - सूत्र

राष्ट्रवादी शरद पवार यांच्या खासदारांची राजधानी दिल्ली इथं उद्या सकाळी १० वाजता सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक होणार. बैठकीत अधिवेशनात विधेयकावर आणि विधेयकाच्या मतदानाच्या संदर्भात चर्चा होणार असून आज रात्री उशिरा सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व खासदार राजधानी दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 

29 Nov 2026 17:06 IST

डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा

डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. डिलिमीटेशन बिलाला विरोध असून इंडिया आघाडी सोबत असल्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. शरद पवार पक्षाने घेतलेल्या निर्णयावर देखील दोघांमध्ये चर्चा झाली. 

29 Nov 2026 16:44 IST

दिल्ली येथील स्टॅलिन यांच्या निवासस्थानी डीएमके नेत्यांची बैठक

दिल्ली येथील स्टॅलिन यांच्या निवासस्थानी डीएमके नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला रुग्णालयातून थेट उदयनिधी स्टॅलिन यांच्या घरी दाखल झालेत. या बैठकीला कनिमोळी, दयानिधी मारन, टी. आर. बालू उपस्थित आहेत. डीएमकेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांना काय उत्तर द्यायचे? याबाबत बैठकीत रणनीतीवर चर्चा सुरू आहे. 

29 Nov 2026 16:18 IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला शिवसेना उबाठा धावलं

अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि दुष्काळाचा फटका बसलेल्या चोंडी गावात शिवसेना उबाठाच्या वतीने तब्बल ५ हजार मदत किटचे वाटप करण्यात आले. या मदत वाटपासाठी ठाण्याचे माजी खासदार आणि शिवसेना उबाठाचे नेते राजन विचारे यांच्यासह पक्षातील तब्बल ४० वरिष्ठ नेते आणि प्रमुख पदाधिकारी अकोला जिल्ह्यात दाखल झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त कुटुंबांना आवश्यक साहित्य देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला

29 Nov 2026 16:15 IST

डिलिमिटेशन विधेयकला आमचा विरोध - उद्धव ठाकरे

डिलिमिटेशन विधेयकावरुन सध्या देशात राजकारण तापलं असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या विरुद्ध भूमिका घेत डिलिमिटेशन विधेयकाला पाठींबा दिला आहे. यावरून आता महाविकास आघडीत वाद पाहायला मिळत असून उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मातोश्रीवर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, 'मी पक्षाचा हिताचा विचार केलाय, या विधेयकला आमचा विरोध आहे. ही भूमिका आम्ही का घेतली, कारण ज्यांनी मतचोरी केली त्यांनाच या समितीवर ठेवण्यात आले आहे. या मध्ये विरोधी लोकांचे मत विचारत घेतले जाणार नाही.  ही समिती चुकीची आहे, हा नुसता एक फार्स आहे, ही मतचोरी करणारी माणसं यात आहेत'.

29 Nov 2026 15:35 IST

डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यावर देशाला त्रास सहन करावा लागेल - उद्धव ठाकरे

डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यावर देशाला त्रास सहन करावा लागेल - उद्धव ठाकरे

डिलिमिटेशन विधेयकावरुन सध्या देशात राजकारण तापलं असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या विरुद्ध भूमिका घेत डिलिमिटेशन विधेयकाला पाठींबा दिला आहे. यावरून आता महाविकास आघडीत वाद पाहायला मिळत असून उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मातोश्रीवर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यावर देशाला त्रास सहन करावा लागेल'. 

29 Nov 2026 15:30 IST

डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी खासदारांची डिनर डिप्लोमसी

बिहार, गुजरात आणि राजस्थानच्या खासदारांसाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. बिहारच्या खासदारांसाठी केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. तर गुजरातच्या खासदारांसाठी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या निवासस्थानी डिनर बैठक होणार आहे. राजस्थानच्या खासदारांसाठी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी डिनर आयोजित करण्यात आलं आहे. उद्या लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. खासदारांशी समन्वय साधणं आणि विधेयकाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणं, हा या बैठकांचा उद्देश असल्याचं मानलं जात आहे. 

29 Nov 2026 15:28 IST

दुष्काळात पिकवलेल्या मक्याच्या दराला आवकेचा फटका

दुष्काळी परिस्थितीचा सामना करत अल्प पाण्यावर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मक्याची आता काढणी सुरू झाली आहे मात्र बाजारात मक्याची आवक वाढल्याने दरावर दबाव निर्माण झाला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज दीडशे ते दोनशे वाहनांतून मक्याची आवक होत असून प्रतिक्विंटल 150 ते 200 रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे 3 हजार 50 रुपयांवर असलेले मक्याचे दर आता 2 हजार 800 रुपयांपर्यंत खाली आले आहेत दरम्यान बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांकडून मका वाळवण्यासाठी पसरवण्यात आल्याने संपूर्ण बाजार आवारात मक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 
 

29 Nov 2026 15:27 IST

परळी रेल्वे स्टेशनवर लिफ्टमध्ये 15 प्रवासी अडकले; तासाभरानंतर सुखरूप सुटका

बीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर लिफ्टमध्ये अर्ध्या तासापासून अडकलेल्या 15 प्रवाशांची अखेर रेल्वे प्रशासनाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अकोल्यावरून परळीत आलेल्या पॅसेंजरमधील प्रवासी स्टेशनबाहेर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेले असता अचानक लिफ्ट बंद पडली. यामध्ये लहान मुलांसह वृद्ध महिला आणि पुरुषांचाही समावेश होता. अर्धा तास लिफ्टमध्ये अडकल्याने अनेक प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुटका करण्यात आली. तब्बल एक तासाच्या या थरारामुळे परळी रेल्वे स्टेशनवरील सुविधांचा बोजवारा उडाल्याचं चित्र असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी लिफ्टमध्ये चढल्याने तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

29 Nov 2026 15:27 IST

कर्जतच्या नेवाळीतील तरुणाची निर्घृण हत्या

कर्जत तालुक्यातील नेवाळी येथे ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह गावाजवळील माळरानावर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे... रोहित संजय ढोले असं मृत तरुणाचं नाव असून, हत्येनंतर त्याची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर ॲसिड टाकण्यात आल्याची माहिती समोर येतेय... गावातील हळदी समारंभासाठी आलेल्या रोहितचा मृतदेह आवळस गावाजवळ आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे... या हत्येचा तपास कर्जत पोलिसांकडून सुरू आहे.

29 Nov 2026 15:26 IST

राज्यातील बळीराजापुढे फ्लॅश दुष्काळाचे नवे संकट

दुष्काळ म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते कोरडं आकाश, पाण्यासाठी वणवण आणि हळूहळू कोरडी पडणारी जमीन. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता दुष्काळाचं आणखी एक धोकादायक रूप उभं राहिलं आहे. काही आठवड्यांतच जमिनीतील ओलावा नाहीसा होण्याचा अंदाज सोलापूरसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासमोर नवं संकट उभा राहण्याची शक्यता भोपाळच्या मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी व्यक्त केलीय. 

29 Nov 2026 15:23 IST

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील अपूर्ण रस्त्याने गेला तरुणीचा जीव

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांचा वेग वाढलाय... मात्र याच विकासकामांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होतोय का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील अपूर्ण रस्त्याने एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप होतोय. श्रुती संतोष घाटोळ या तरुणीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, रस्त्याच्या धोकादायक साईडपट्ट्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मनसेने रास्तारोको करत संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केलीय. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES