एकनाथ शिंदेच्या 15 खासदारांनी एकत्र येऊन घेतला मोठा निर्णय
परिसीमन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खासदारांच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला.
एकनाथ शिंदे शिवसेना : संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात सादर होणाऱ्या 'महिला आरक्षणाशी संबधित 'परिसीमन' विधेयकाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव आज शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या या बैठकीत शिवसेनेचे सर्व 15 खासदार उपस्थित होते. या ऐतिहासिक निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्यासाठी सर्व खासदारांनी रविवारीच दिल्लीला पोहोचावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
लोकसभेचे सोमवार 30 नोव्हेंबर रोजी तर राज्यसभेचे बुधवार 2 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात घटनादुरुस्ती व परिसीमन विधेयक सरकारकडून मांडली जातील. या विधेयकाद्वारे महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. लोकसभेची एकूण सदस्यसंख्या 50 टक्क्यांनी वाढून 543 वरून 815 इतकी होईल, तर महाराष्ट्रातील लोकसभा जागा 48 वरून 72 होतील. यामुळे दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज अधिक बुलंद होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेना-भाजप युतीमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच राष्ट्रहिताची भूमिका घेतली होती, त्याच वाटेवर चालत 'नेशन फर्स्ट' हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. एनडीएच्या बैठकीत शिवसेनेला नेहमीच महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. 7 टक्के जीडीपी दरामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही भारताचे कौतुक केले. देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे लोकसभेचे 13 आणि राज्यसभेचे 2 असे सर्व खासदार दोन्ही सभागृहांत विधेयकाच्या बाजूने मतदान करतील, असे ते म्हणाले.
1976 पासून मतदारसंघांची संख्या गोठवण्यात आली आहे. सद्यस्थितीत एका खासदाराला २० ते २५ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करावे लागत आहे. 'एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य' या लोकशाही सूत्रानुसार मतदारांना न्याय देण्यासाठी, तसेच गावे आणि शहरांच्या समतोल विकासासाठी मतदारसंघ पुनर्रचना करणे काळाची गरज आहे. यामुळे खासदारांचे काम सुटसुटीत होईल आणि मतदारांनाही आपल्या लोकप्रतिनिधींची भेट घेणे सोपे जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवसेना या संविधान दुरुस्ती विधेयकांच्या बाजूने मतदान करणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय राजकीय परिवर्तनाची नवी क्रांती घडवून आणेल, ज्यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल आणि तिचा विस्तार होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
आजच्या बैठकीतील ठरावाची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू आणि केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल व एनडीएच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात येणार आहे.
मुंबईतील नंदनवन निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग अप्पा बारणे, संदिपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाउसाहेब वाकचौरे, डॉ. ज्योती वाघमारे उपस्थित होते. तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार मिलिंद देवरा आणि खासदार संजय दिना पाटील यांनी व्हिसीद्वारे उपस्थिती लावली.