मुंबईत छट पूजेवरुन वातावरण तापलं, सोनू सूदच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा
गेल्या काही दिवसांपासून छट पूजेवरुन सुरु असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. या वादात आता सोनू सूदने उडी घेतली आहे.
छटपूजेवरुन मुंबईत सुरु असलेल्या वादात आता अभिनेता सोनू सूद यांनीही उडी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समुद्राकिनाऱ्यांवर किंवा ऐतिहासिक स्थळांवर छटपूजा न करता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणे कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी अशी भूमिका घेतली आहे. मात्र आता या वागात अभिनेता सोनू सूद यानेही उडी घेत थेट मनसेला आव्हान दिलं आहे.
मुंबईतील जुहू बीचवर छटपूजा साजरी करण्यास मनसेनं विरोध केला असताना आता 15 नोव्हेंबरला संध्याकाळी छटपूजेसाठी जुहू बीचवर येणार असून छटपूजा साजरी करणार असल्याचं सोनू सूदनं म्हटलं आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे यावरुन आता वाद रंगण्याची शक्यता आहे.
आता सोनू सूदचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेच्या भूमिकेला राजकीय रंग देण्यासाठी सोनू सूदने व्हिडिओ केलाय का? असा सवालही केला जात आहे. मात्र सोनू सुदने व्हिडिओमध्ये कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे नाव घेतलं नसून फक्त येण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं सोनूने थेट मनसेला आव्हान दिलं का? अशी चर्चा होताना दिसतेय.
दरम्यान, आजपासून छठ उत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत गिरगाव, बाणंगगा या शिवाय अन्य ठिकाणी छठ उत्सवाला विरोध होत आहे. तसेच छठपूजेसाठी महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तसंच, गिरगाव चौपाटीवर छटपूजा आयोजित करण्यासाठी परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. गिरगाव चौपाटीऐवजी अन्य पर्यायी ठिकाणी छटपूजा आयोजित करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही न्यायालयाने आदेश देण्यास नकार दिला आहे.
छटपुजेवरुन मुंबई वाद
मुंबईतील काही लोकल रेल्वे स्थानकांवर (उदा. सानपाडा इ.) छटपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती, ठाकरे गट शिवसेना आणि मनसेने यावर तीव्र आक्षेप घेत मराठी गाणी आणि घोषणांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.