एअर इंडिया विमान हायजॅकचा मेसेज, 105 प्रवासी उतरवले; पत्नी प्रेमापोटी कारनामा करणारा 'असा' सापडला
पत्नीच्या आजारपणामुळे परदेशात जायचे नव्हते म्हणून विमानात हायजॅकची खोटी धमकी दिल्याचे वृत्त समोर आलेय. कोलकाता-मुंबई एअर इंडिया फ्लाइट प्रकरणात पार्थ प्रतिम नंदीला अटक करण्यात आलीय.
मुंबईच्यादिशेने येणारे एअर इंडियाचे विमान हायजॅक झाल्याचे वृत्त 11 नोव्हेंबर रोजी समोर आले होते. दरम्यान या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा झालाय. हे कोणते दहशतवादी कृत्य नव्हते तर एका पतीने पत्नीप्रेमापोटी केलेला अगाऊपणा होता हे सिद्ध झालंय. या प्रकरणातील आरोपी पत्नीची तब्येत ठीक नसताना तिला एकटीला सोडून परदेशात नोकरीसाठी जायचे नव्हते. या वैयक्तिक कारणातून एका 56 वर्षीय व्यक्तीने चक्क विमान अपहरणाची खोटी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलकात्याहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील स्वच्छतागृहात धमकीची चिठ्ठी आढळल्यानंतर विमानतळावर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. तब्बल सात तासांहून अधिक काळ विमानाचे उड्डाण रखडले. या प्रकरणी पार्थ प्रतिम नंदी याला अटक करण्यात आली आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
विमानाच्या स्वच्छतागृहात आढळली हायजॅकची धमकी
11 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईकडे जाणारे एअर इंडियाचे AI 2772 हे विमान उड्डाणासाठी सज्ज होते. विमानात 105 प्रवासी होते. त्याचवेळी सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी एका क्रू मेंबरला विमानाच्या स्वच्छतागृहात हस्तलिखित चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत विमानाचे अपहरण होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यात 11 वाजून 10 मिनिटांचा उल्लेखही होता. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली.
105 प्रवाशांना उतरवले
धमकीची माहिती मिळताच वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच एटीसीला सतर्क केले. नियमानुसार विमानाचे उड्डाण थांबवून ते स्वतंत्र आयसोलेशन बे येथे नेण्यात आले. विमानातील सर्व 105 प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यांच्या हँडबॅगची तपासणी करण्यात आली, तर चेक-इन सामानही उतरवून पुन्हा तपासण्यात आले. विमानाच्या आतील भागाचीही सुरक्षा पथकांनी झडती घेतली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
सात तासांहून अधिक उशिराने विमानाचे उड्डाण
सुरक्षा तपासणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. नियोजित वेळेपेक्षा सात तासांहून अधिक उशिराने, सायंकाळी 5 वाजून 38 मिनिटांनी विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
पार्थ प्रतिम नंदीला अटक
या प्रकरणाचा तपास करताना सुरक्षा यंत्रणांनी एका प्रवाशाला ताब्यात घेतले. त्याची ओळख पार्थ प्रतिम नंदी अशी पटली असून तो पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा रहिवासी आहे. धमकीच्या चिठ्ठीवरील हस्ताक्षर आणि संशयिताचे हस्ताक्षर जुळल्याने त्याच्यावर संशय बळावला. त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी ताब्यात घेतल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले.
पत्नीच्या आजारपणामुळे मानसिक तणावात
तपासादरम्यान नंदी याने विमानात धमकीची चिठ्ठी ठेवल्याची कबुली दिली. मी स्वतः आणि माझी पत्नी कर्करोगाने ग्रस्त आहेत. नोकरीसाठी मला आधी मुंबईला आणि त्यानंतर आफ्रिकेत जायचे होते. आजारी पत्नीला एकटे सोडून जाण्याची माझी इच्छा नव्हती. या तणावातून आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.