'अजितदादांच्या अपघातामागचा 'मफलर मॅन' कोण?' मुंबई-पुण्यात बॅनरची चर्चा, सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'भाई का सिनेमा आ रहा है...'
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लागलेल्या पोस्टरची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आणि त्यामागील घातपाताच्या संशयावरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 'मफलरवाला नेता' (मफलर मॅन) हा शब्द सातत्याने समोर येत आहे. मफलरवाला नेता कोण अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात होताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. अजित पवार असतांना विलीनीकरणाची चर्चा होती. मात्र, ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं त्यादिवशी विलीनीकरणाच्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांना 16 नोव्हेंबर रोजी मफलर मॅनबाबत मोठा खुलासा होणार असल्याच्या प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आगे.
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, थोडा पेशंन्स ठेवा. सलमान खानचा पिक्चर बघताना आधी कसं जाहिराती बघताना उत्सुकता वाढते. की भाईका पिक्चर देखने जाना है. तसं आहे ते. ट्रेलर आलाय, ट्रेलर ही कॉन्सेप्ट कशासाठी आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी. भाई का सिनेमा आ रहा है... किप एंगेज, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
तसंच, मी काही दिवसांपासून खूप व्यस्त होते. त्यामुळं मला याच्याबाबत काही माहिती नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मफलर मॅनचे मुंबईत बॅनर?
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेरील रहस्यमय पोस्टरने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पोस्टरवर अजितदादांच्या अपघात / घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?” असा थेट सवाल या पोस्टरमध्ये विचारण्यात आला आहे. या पोस्टरवर मफलरची प्रतिकृती पाहायला मिळत आहे. मात्र कोणत्याही नावाचा उल्लेख नाही करण्यात आलेला नाही.
पुण्यातही पोस्टर
मुंबईपाठोपाठ पुण्यात ही लागले मफलर वाला नेता कोण याचे फ्लेक्स लागले आहेत. डेक्कन भागात हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. फ्लेक्सवर अजित पवार यांच्या अपघात/घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण ? असा मजकूर छापण्यात आला आहे.
16 नोव्हेंबरला खुलासा?
या बॅनरवर येत्या 16 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता याच ठिकाणी काहीतरी मोठा राजकीय खुलासा होणार असल्याचे नमूद केले आहे, मात्र त्यावर कोणत्याही नेत्याचे नाव किंवा आयोजकाची माहिती दिलेली नाही.
रोहित पवारांनी केला होता दावा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे आमदार रोहित पवार यांनी आरोप केला होता की, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाशी संबंधित 'VSR Ventures' कंपनीला एका मोठ्या राजकीय नेत्याने संरक्षण दिले आहे. त्यांनी या नेत्याला 'मफलरवाला नेता' असे संबोधले होते आणि हा नेता केंद्रातील नसून महाराष्ट्रातीलच एक शक्तिशाली नेता असल्याचा दावा केला होता.