शिर्डीचे साईबाबा, ₹22 कोटी अन् ... बाळासाहेबांनी कोणाला पाठवलेली 'मातोश्री'मधील स्वत:ची चांदीची खुर्ची? अख्ख्या देशभर गाजलेलं प्रकरण
बाळासाहेब हे त्यांच्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखले जायचे. अनेकदा एखादा मुद्दा पटला नाही तर ते थेट तो बोलून दाखवायचे. असाच एक प्रकार 2006 मध्ये घडला होता. नेमकं तेव्हा काय झालेलं जाणून घेऊयात...
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची 14 वी पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी 2012 मध्ये बाळासाहेबांचं निधन झालं. बाळासाहेबांची उणीव आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रकार्षाने जाणवते. बाळासाहेब हे त्यांच्या रोखठोक मतांसाठी ओळखले जायचे. अनेकदा त्यांनी टीकाकारांना आपल्या कृतीमधून उत्तरं दिली आहेत. असाच एक किस्सा घडला तो बाळासाहेबांच्या खुर्चीसंदर्भात. नेमकं काय झालं होतं जाणून घेऊयात सविस्तरपणे...
नेमकं झालेलं काय?
हा किस्सा 2006 सालातील आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीसाठी 22 कोटी रुपयांचे सोन्याचे सिंहासन बनवण्याचा प्रस्ताव होता. मात्र यावर्षी जसा दुष्काळ पडला आहे तशीच काहीशी स्थिती असल्याने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना इतका पैसा मूर्तीसाठी खर्च करण्याऐवजी तो पैसा गरीब शेतकऱ्यांसाठी वापरावा, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. त्यांनी ती उघडपणे मांडलीही होती.
टीका बाळासाहेबांच्या वाचनात आली अन्...
मात्र बाळासाहेबांच्या या भूमिकेवरुन एका वृतपत्रामधून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या वृत्तपत्राने, "बाळासाहेब ठाकरे स्वतः चांदीच्या सिंहासनावर बसतात" अशा अर्थाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. ही बातमी बाळासाहेबांच्या वाचनात आली आणि त्यानंतर त्यांनी या टिकेला थेट कृतीमधून उत्तर देण्याचं ठरवलं. ज्या वृत्तपत्राने ही बातमी दिली होती त्यांना उत्तर देण्यासाठी बाळासाहेबांनी आपली ती चांदीचा मुलामा असलेली लाकडी खुर्ची थेट या वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये पाठवली.
खुर्चीसाठी काचेचा दरवाजा काढावा लागला
ही खुर्ची तुमच्याकडे पोहोचल्याची पोचपावती पाठवून द्या असा निरोपही बाळासाहेबांनी पाठवला होता. 10 फूट उंच खुर्ची मुंबईतील चिंचपोकळीतील कार्यालयात पाठवली होती. विशेष म्हणजे ही खुर्ची त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात ठेवण्यासाठी चक्क तिथला काचेचा दरवाजा काढावा लागला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी एका वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये स्वत:ची 'मातोश्री' बंगल्यावरील चांदीची खुर्ची पाठवल्याचं प्रकरण देशभरामध्ये चर्चेत होतं.
चांदीच्या खुर्चीचं सत्य बाळासाहेबांनीच सांगितलं
काही दिवसांनंतर, 29 ऑगस्ट 2006 रोजी या वृत्त समूहाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संपादकांनी स्वतः बांद्रा येथील 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन ही खुर्ची बाळासाहेबांना सन्मानाने परत केली होती. खुर्ची परत स्वीकारताना बाळासाहेबांनी ही खुर्ची लाकडाची असल्याचं स्पष्ट केलं होतं. भारतीय कामगार सेनेने ही खुर्ची मला भेट म्हणून दिली असून या खुर्चीवर फक्त चांदीचा पातळ पत्रा चढवलेला आहे. ही मूळ लाकडी खुर्ची आहे, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. तसेच आपल्या खास शैलीमध्ये सुनावताना, "मी जिथे बसतो तेच माझे सिंहासन असते, आता सुताराला बोलावून या खुर्चीवरचा चांदीचा पत्रा काढायला सांगणार आहे," असेही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते.