मुंबईकरांनो, दिवाळीसाठी घेतलेलं रॉकेट दुकानदाराला परत करा; BMC चा मोठा निर्णय; 25 नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू!
मुंबईत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 25 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.गच्ची, बाल्कनी आणि खासगी जागांनाही निर्बंध लागू असेल. BMC चा नवा आदेश काय? सविस्तर जाणून घेऊया.
दिवाळीच्या उत्साहात फटाके फोडण्याचा विचार करत असाल, तर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका आणि शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रॉकेट तसेच आकाशात उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. हा प्रतिबंधात्मक आदेश 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू झाला असून 25 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत लागू राहणार आहे. काय झालाय निर्णय? याचा तुमच्यावर कसा होईल परिणाम? जाणून घेऊया.
काय झालाय निर्णय?
शहरी भागातील दाट लोकवस्ती, उंच इमारती, झोपडपट्ट्या आणि अरुंद रस्त्यांवर फटाक्यांमुळे आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी केवळ सार्वजनिक ठिकाणांपुरती मर्यादित नसून खासगी जागांनाही लागू आहे. त्यामुळे घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा पार्किंगमध्ये रॉकेट उडवण्याचा विचार करणाऱ्यांनीही सावध राहणे आवश्यक आहे.
रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर पूर्ण बंदी
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रॉकेट आणि तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास पूर्ण प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे फटाके उडवताना ते इमारतींच्या खिडक्यांमध्ये, बाल्कनीत किंवा छतावर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आग लागून मोठे नुकसान होऊ शकते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.
घराची गच्ची, बाल्कनी आणि पार्किंगमध्येही बंदी
मुंबईतील सार्वजनिक तसेच खासगी जागांवर हा आदेश लागू असणार आहे. यामध्ये निवासी इमारती, गच्च्या, बाल्कनी, मोकळ्या जागा, पार्किंग लॉट, झोपडपट्टी परिसर, रस्ते, बागा आणि इतर परिसरांचा समावेश आहे.
25 नोव्हेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत निर्बंध
महापालिका आयुक्त तथा शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रभारी अध्यक्ष प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी हा आदेश जारी केला आहे. 9 नोव्हेंबर 2026 रोजी आदेश जारी होताच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 25 नोव्हेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार असल्याचे आदेशात म्हटलंय. त्यामुळे या कालावधीत मुंबई महापालिका हद्दीत रॉकेट आणि तत्सम हवेत उडणारे फटाके फोडता येणार नाहीत.
मुंबईत आगीच्या घटनांमुळे प्रशासनाचा कठोर निर्णय
गेल्या काही दिवसांत फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.8 नोव्हेंबर रोजी मुंबई अग्निशमन दलाला आगीच्या 142 घटनांचे कॉल प्राप्त झाले. त्यापैकी 137 घटना फटाक्यांशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. डोंगरी आणि विद्याविहार परिसरातही आगीच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. रॉकेटचे जळते अवशेष इमारतींच्या छतांवर, खिडक्यांमध्ये किंवा ज्वलनशील वस्तूंवर पडल्यास आग भडकण्याचा धोका असतो. मुंबईतील दाट लोकवस्ती आणि उंच इमारतींची रचना लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.