मुंबई अंडरवर्ल्डचा सूत्रधार दाऊदच्या जुन्या घराची निशाणी मिटवणार; BMC कारवाईला स्थानिकांचा विरोध का?
दाऊद इब्राहिमचे जुने घर असलेल्या भेंडी बाजारातील हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना इमारतीवर 18-19 नोव्हेंबरला BMC पाडकामाची कारवाई करणार आहे.
मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जुन्या घराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. मुंबईत ज्या ठिकाणी दाऊद इब्राहिम वास्तव्य होता की हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना इमारत नव्वदीच्या काळात कुप्रसिद्ध होती. दरम्यान या इमारतीवर मुंबई महापालिकेकडून 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी पाडकामाची कारवाई केली जाणार आहे. ही इमारत अतिधोकादायक घोषित करण्यात आली असून, कारवाईदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मात्र, या कारवाईला स्थानिकांकडून आक्षेप घेतला जातोय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
दाऊदच्या जुन्या वास्तव्यामुळे इमारत चर्चेत
भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीट आणि सेकंड कूपर स्ट्रीट परिसरात ही इमारत आहे. हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूत दाऊद इब्राहिमचे पूर्वी वास्तव्य होते. त्याचे घर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होते. त्यामुळे या इमारतीच्या पाडकामाकडे केवळ मुंबईकरांचेच नव्हे, तर देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
इमारतीला पालिकेची नोटीस
महापालिकेने ही इमारत सी-1 म्हणजेच अतिधोकादायक श्रेणीत वर्गीकृत केलीय. इमारतीची अवस्था जीर्ण झाल्याने रहिवासी, पादचारी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे इमारत रिकामी करून पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दोन दिवस पोलिसांचा बंदोबस्तात कारवाई
18 आणि 19 नोव्हेंबर रोजी या इमारतीवर कारवाई करण्याचे नियोजन आहे. न्यायालयीन आदेशांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया पोलिस बंदोबस्तात पार पडणार आहे. गर्दीच्या भेंडी बाजार परिसरात पाडकाम करताना सुरक्षिततेची काळजी घेणे महापालिकेसमोर महत्त्वाचे आव्हान असेल.
प्रार्थना हॉलसाठी पर्यायी व्यवस्था
या इमारतीच्या तळमजल्यावर प्रार्थना हॉल आहे. त्याचा वापर करणाऱ्यांना दुसरीकडे व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने धार्मिक विधी सुरू ठेवण्यासाठी पर्यायी जागा किंवा भाड्याने जागा घेण्यासाठी आर्थिक मदत असे दिलीय. प्रार्थना हॉलमधील धार्मिक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहनही करण्यात आलंय.
कारवाईवर स्थानिकांचा आक्षेप
या कारवाईवर काही स्थानिक रहिवासी आणि संबंधित ट्रस्टच्या बाजूने लढणाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. वक्फ न्यायाधिकरणाने स्थगिती दिलेली असताना महापालिकेने घाईने नोटीस बजावल्याचा त्यांचा आरोप आहे. 16 नोव्हेंबरला नोटीस लावून केवळ 24 तासांची मुदत दिलीय. त्यामुळे प्रत्यक्ष पाडकामापूर्वी काय होणार? याकडे लक्ष लागलंय.