दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार! CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा, म्हणाले 'विधिमंडळ अधिवेशनात...'
दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दादर स्थानकाचं नाव बदलून 'चैत्यभूमी' करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार असल्याचं त्यांन सांगितलं आहे. तसंच यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा व वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती दिली आहे.
यापूर्वीच तत्वतः मान्यता
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिनिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
नामांतरासाठी नेत्यांच्या मागण्या आणि आंदोलनं
दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याची मागणी अनेक राजकीय नेते आणि आंबेडकरी संघटनांनी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी 9 जुलै 2024 रोजी त्यांनी विधिमंडळात दादर स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याची मागणी केली होती. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी 6 डिसेंबर 2023 रोजी ही मागणी केली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांचे अध्यक्ष सचिन खरात यांनीही हा मुद्दा मांडला होता. तसंच भीम आर्मी संघटनेनेही दादर स्थानकाचे नामकरण करण्यासाठी आंदोलन केले होते.
इंदू मिल येथील स्मारकाच्या कामासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.