‘फार छोटा विषय...’, दिया मिर्झावरील वादावर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘त्या काय भारताच्या मोठ्या...’
दिया मिर्झाच्या व्हिडीओवरुन निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त झाले आहेत.
मुंबई महापालिकेने बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने मुंबईकरांना दिवाळी फटाक्यांचा आवाज आणि धूर न करता, दिव्यांच्या प्रकाशात साजरी करण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ हटवल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. महापौर रितू तावडे यांनी दियाने आम्हाला हिंदू सणांच्या बाबतीत शिकवू नये असं सांगताना तिला ब्लॅकलिस्ट केल्याचं जाहीर केलं आहे. दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी महापालिकेला फटकारलं असून, याला धार्मिक रंग देणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया देताना हा फार छोटा विषय असल्याचं म्हटलं आहे.
दिया मिर्झाच्या व्हिडीओवरुन निर्माण झालेल्या वादाबद्दल विचारलं असता त्यांनी ही फार छोटी गोष्ट असल्याचं म्हटलं. तसंच कोर्टाने फटकारलं आहे असं सांगितलं असता म्हणाले, “मला वाटत नाही उच्च न्यायालयाने फटकारलं असेल, एखादं मत व्यक्त केलं असेल. कारण ही केसच उच्च न्यायालयात गेली नाही, तर फटकारण्याचं कारणच नाही”.
“डिलीट केलं असेल तर ती मुंबई महापालिकेची मर्जी आहे. कुठलंही हँडल चालवत असताना काय काढायचं आणि काय ठेवायचं हा ज्याचं हँडल आहे त्याचा अधिकार आहे. त्यांनी ते केलं आहे. दिया मिर्झा एक प्रथितयश अभिनेत्री असतील, पण भारताच्या काय मोठ्या नेत्या नाहीत. त्यामुळे हा आमच्या पातळीचा विषय नाही. तुम्ही आमच्या पातळीचे प्रश्न विचारा, छोट्या पातळीचे प्रश्न विचारता,” असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करण्यास नकार दिला.
दरम्यान यावेळी फडणवीसांना शेतकऱ्यांना फक्त 5 हजारांची मदत करण्यावरुन विरोधक टीका करत असल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “ज्यांना मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरायच आहे आणि मोठ्या घरात रहायचं आहे त्यांना याची किंमत कळणार नाही. या आधीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम त्यांनी केले आहे आणि तेच बोलत आहे. शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र मदत करणारच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते सांगितले आहे”.
नेमका वाद काय?
दिया मिर्झाने मुंबईकरांना दिवाळी फटाक्यांचा आवाज आणि धूर न करता, दिव्यांच्या प्रकाशात साजरी करण्याचे आवाहन केले होते. हा व्हिडीओ मुंबई महापालिकेने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला होता. मात्र भाजपा नेत्यांनी आक्षेप नोंदवत दिवाळी कशी साजरी करावी, हे शिकण्याची गरज मिर्झा यांच्याकडून का पडावी? असा प्रश्न विचारला. तसेच, त्यांनी या मोहिमेला 'हिंदूविरोधी' संबोधलं.यानंतर महापालिकेडून व्हिडीओ हटवण्यात आला. मात्र इतर सेलिब्रिटींचे व्हिडीओ तसेच ठेवण्यात आले. महापौर रितू तावडे यांनी दियाने आम्हाला हिंदू सणांच्या बाबतीत शिकवू नये असं सांगताना तिला ब्लॅकलिस्ट केल्याचं सांगितलं.
हायकोर्टाने फटकारले
“आम्ही जेव्हा एखादा आदेश देतो, तेव्हा त्यात अशी कोणतीही अट असते का की, अमुक एका व्यक्तीला प्रचार किंवा पाठपुरावा करण्याचा अधिकार नाही? एखादी व्यक्ती स्वेच्छेने पुढे येते आणि ती नेहमीच सामाजिक कार्यांशी जोडलेली राहिली आहे, तर तुम्ही तिलाच फटकारत आहात? अशा प्रकारच्या संकुचित मानसिकतेचे आम्ही समर्थन करत नाही,” अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने फटकारलं असून व्हिडीओ पुन्हा टाकण्यास सांगितलं आहे.