सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने राज्यभर विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत पतंजलीच्या गायीच्या तुपासह तब्बल 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत 19 खाद्य व्यावसायिकांचे परवाने आणि नोंदणी निलंबित करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे आणि सातारा यांसह राज्यातील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
छत्रपती संभाजीनगरमधील पतंजली आयुर्वेदच्या सुपर वितरकाकडून 2 हजार 279 लिटर गायीचे तूप जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत सुमारे 20.20 लाख रुपये आहे. मेसर्स दिव्य महावितरक या वितरकाकडे एफडीएने तपासणी केली. चुकीचे लेबलिंग आणि भेसळीच्या संशयावरून तुपाच्या एकूण 4 हजार 32 युनिट्सवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये 2 हजार 998 युनिट्समध्ये 1 हजार 349 लिटर तूप आणि उर्वरित 1,034 युनिट्समध्ये 930.6 लिटर तूप होते. या साठ्याबाबत अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 मधील तरतुदींचे प्राथमिकदृष्ट्या उल्लंघन झाल्याचे एफडीएने म्हटलय.
राज्यातील 19 खाद्य व्यावसायिकांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली. यामध्ये नमकीन, मिठाई आणि मसाले तयार करणाऱ्या उद्योगांचा समावेश आहे. मुंबई, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील काही आस्थापनांमध्ये स्वच्छतेचा अभाव, खाद्यपदार्थांची अयोग्य साठवणूक, कीटक नियंत्रणाची अपुरी व्यवस्था आणि साफसफाईच्या नोंदी नसल्याचे आढळले. काही ठिकाणी आवश्यक कागदपत्रे आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालनही झाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
या मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे अवेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडकडून 1 लाख 44 हजार 218 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. साताऱ्यातील अमिन ट्रेडर्स या व्यापाऱ्याकडून 20 हजार 560 किलो तांदूळ, डाळी, गूळ आणि इतर खाद्यपदार्थांचा साठा जप्त झाला. साताऱ्यातील स्वाती ऑईल मिल्स आणि सोलापूरमधील एस.जी.ट्रेडर्स येथूनही खाद्यतेल जप्त करण्यात आले. या कारवाईत वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश होता.
एफडीएने राज्यातील सात विभागांतील 114 आस्थापनांमधून सुमारे 3.53 लाख किलो खाद्यपदार्थ जप्त केले. या साठ्याचे एकूण मूल्य 9.1 कोटी रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. याशिवाय 28 ते 31 ऑक्टोबरदरम्यान प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा 79.40 लाख रुपयांचा साठा 17 ठिकाणांहून जप्त करण्यात आला. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांतील 34 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांचीही तपासणी करण्यात आली. त्यापैकी 29 ठिकाणांना सुधारणा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या.
या विशेष मोहिमेदरम्यान 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून 16 जणांना अटक करण्यात आली. सात आस्थापने सील करण्यात आली, तर सहा वाहने जप्त करण्यात आली. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 तसेच संबंधित नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ग्राहकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना पॅकिंग, बॅच क्रमांक, उत्पादन तारीख, ‘बेस्ट बिफोर’ तारीख आणि परवाना क्रमांक तपासावा. विशेषतः सणासुदीच्या काळात सैल स्वरूपात किंवा लेबल नसलेले खाद्यपदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.