'हे दुर्दैवी आहे, चूक झाली हे मान्य करा', स्थायी समितीत मराठी विरुद्ध इंग्रजी संघर्ष; मनसे आक्रमक, अध्यक्ष म्हणाले 'मराठीत कामकाज....'
मुंबईच्या रेल्वे स्थानकावर भोजपुरी विरुद्ध मराठी संघर्ष सुरु असताना स्थायी समितीत मराठी विरुद्ध इंग्रजी संघर्ष पाहायला मिळाला.
मुंबईच्या रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याने भोजपुरी विरुद्ध मराठी असा संघर्ष उभा राहिला आहे. आपल्याच महाराष्ट्रात मराठीला दुय्यम स्थान दिलं जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच आता स्थायी समितीत मराठी विरुद्ध इंग्रजी संघर्ष पाहायला मिळाला. मराठीमध्ये सादरीकरण करण्याऐवजी इंग्रजीत सादरीकरण केल्याने मनसेने आक्रमक होत आक्षेप नोंदवला. महापालिकेत मराठीत कामकाज चालतं, मग पीपीटी इंग्रजीत का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसंच आपली चूक झाल्याचं मान्य करा अशी मागणीही केली.
मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आला होता. महापालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानालगत असलेल्या महापालिका जीमखान्याच्या जागेवर सहा मजली इमारत उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 38 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मात्र इंग्रजीत सादरीकरण तयार केल्याने मनसे आक्रमक झाली. प्रस्ताव सुरू होण्यापूर्वी मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी आक्षेप नोंदवला. महापालिकेत मराठीत कामकाज चालत असताना पीपीटी इंग्रजीत का? असा प्रश्न यशवंत किल्लेदार यांनी विचारला. तसंच
हे दुर्दैवी आहे, चूक झाली हे मान्य करा अशी मागणी केली.
यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही कामकाज मराठीत असलं पाहिजे हे अधोरेखित केलं. हे योग्य नाही हे मान्य करायला हवे, प्रशासनाने याची काळजी घ्यायला हवे. कामकाज मराठीत असावे असे ते म्हणाले आहेत.
मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीत मंजुरी
आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिकेच्या नव्या सभागृहाच्या इमारतीचा प्रस्ताव सहमताने मंजूर करण्यात आला. मुंबई महापालिकेचे कामकाज सुरू झाल्यापासून स्थायी समिती चा हा पहिला प्रस्ताव आहे, जो सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन सहमताने मंजूर करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानालगत असलेल्या महापालिका जिमखान्याच्या जागेवर सहा मजली इमारत उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 38 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे.
कसे असणार सभागृह
- 330-350 आसनक्षमतेचे सभागृह उभारण्यात येणार
- 60 वाहनांच्या पार्किंगची सुविधाही असणार आहे.
- महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेते यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालयांची तरतूद
- इमारतीच्या पहिल्या दोन मजल्यांवर पोडियम, तर चौथ्या मजल्यावर पदाधिकाऱ्यांची कार्यालये असणार आहेत.
या इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी साधारण दोन ते अडीच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.