दादर स्टेशनचं नाव 'चैत्यभूमी' करण्याच्या मुद्द्यावरून आता महायुतीमध्येच दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2023 मध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणारे माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी या प्रस्तावाला विरोध करताना थेट मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे.
भाजपाकडून मतांचं राजकारण करत ध्रुवीकरण
"महाराष्ट्र भाजपच्या महाराष्ट्राच्या शीर्षस्थ नेतृत्वाने-थिंकटँकने आधी मुंबईत कबूतरबाजीवरुन वाद पेटवला. मराठी विरुद्ध गुजराती/जैन समाज असा वाद भडकावला आणि मतांचं राजकारण करत ध्रुवीकरण केलं. नंतर छटपूजेवरुन वातावरण भडकवत मराठी विरुद्ध बिहारी/उत्तर भारतीय वाद पेटवला. छट उत्सवानंतर मुंबईतील बिहारी/भैय्यांनी मराठी माणसाला हिणवलं. पाणउतारा करत मराठी माणूस कोपऱ्यात ढकलला. सोशल मिडियावरुन मराठी माणसाविरुद्ध विषारी गरळ ठरवून सामूहिकपणे ओकली. आव्हाने दिली. मराठी माणसाला हिणवलं. पण मराठी माणसाने संयम दाखवला. मराठी समाज त्यांचा कावा ओळखून शांत बसला. भाजपने स्वतःची व्होटबँक मजबूत केली. पण मराठी अस्मिता जखमी केली. भाजपने मौनव्रत स्वीकारत मराठी माणसाला अपमानित केलं. एकटं पाडलं," असा घणाघात शिशिर शिंदेंनी केला आहे. एवढ्यावरच न थांबताना, "आता दादरचे नाव बदलून “चैत्यभूमी” नामकरणाची उबळ या भिक्कार भाजपला आली," असं शिशीर शिंदे म्हणालेत.
...आणि परप्रांतीयप्रेमी भाजप मिठाई वाटणार
"म्हणजे म-हाठींमधेच फूट पाडून मुंबईसह महाराष्ट्रात रस्त्यावर मराठी माणसांमध्येच आपसांत संघर्ष या भाजपला घडवायचा आहे. म-हाठी माणसांनी आपसात डोकी फोडली की आणि भाजप मनोमन खूश होऊन रेशीमबागेत नाचणार. म-हाठी व्होटबँक फोडली म्हणून नाचणार. पोलिस ॲक्शन जोरदार होणार. पोलिस दडपशाहीने तुरुंगात म-हाठीच तरुण जाणार. मराठी जनांचे भवितव्य पोलिसांच्या खुंटीवर टांगणार. मराठींच्या चांगल्या रोजगार संधी घालवणार. मराठी माणूस अशक्त होणार. मराठी शक्ती क्षीण होणार आणि परप्रांतीयप्रेमी भाजप मिठाई वाटणार," असं शिशीर शिंदेंनी म्हटलं आहे.
हे मराठीद्रोही अस्वस्थ झालेत
"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय भव्य आणि ऐतिहासिक स्मारक इंदू मीलमध्ये पूर्णत्वास येत आहे. गेले काही वर्षे इंदू मिलमधील स्मारकाचे रखडलेले आहे. प्रत्येक मराठी माणसाला भारतरत्न बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दल आपुलकी आहे. जिव्हाळा आहे. आम्ही महामानव बाबासाहेबांच्या परिपूर्ण स्मारकासाठी आतूर आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मराठी बांधव पुढील महिन्यात श्रद्धेने महापरिनिर्वाण दिनासाठी भाजपच्या आमंत्रणाविना येणार आहे. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून स्वखर्चाने बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईत येतात. स्वतःची तहानभूक विसरुन महामानव बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करतात. पददलित येथेच अन्यायाविरुद्ध लढण्याची स्फूर्ती मिळवतात. असे भाग्य संपूर्ण देशातील इतर कोणत्या भाजप नेत्याला लाभले असेल तर भाजपने जाहीर करावे. बाबासाहेबांच्या अनुयायांचा महासागर पाहून हे मराठीद्रोही अस्वस्थ झालेत," अशी टीका शिशिर शिंदेंनी केली आहे.
भाजपला खाजच असेल व खराखुरा मनापासून आदर भारतरत्न बाबासाहेबांबद्दल असेल तर...
"महाराष्ट्रात जातीभेद गाडून म-हाठी शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकत्र करत या वज्रमूठीला टोकदार व धारदार करत बळकट केले. दादरचे नाव बदलण्याचा घाट बाळासाहेब ठाकरेंनी यशस्वीपणे,लढाऊ बाण्याने हाणून पाडला होता.हा गौरवशाली इतिहास भाजप विसरला आहे. महाराष्ट्राच्या 1969 च्या सीमा लढ्यात नरराक्षस मोरारजी देसाईंच्या गाडीने उन्मत्तपणे दादरच्या वेशीवर शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले होते. मोरारजीचा सत्तेचा माज म-हाठी माणसाने लढून उतरवला व नरराक्षस मोरारजीला मुंबईतून पिटाळून लावले. शेकडो मराठी माणसांचे रक्त मोरारजी देसाईने सांडले हाच खरा इतिहास आहे. बाळासाहेबांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेबांचा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात पार पडला. बाळासाहेबांचे शिवसैनिक व म-हाठी बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईत रिगल थिएटरजवळील पुतळ्याला वंदन करायला आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर “शक्तिस्थळावर” बाळासाहेबांना अभिवादन करायला उपस्थित होते.
मुंबईत, महाराष्ट्रात आता मराठींनी आपसातच वाद-विवाद करावे प्रसंगी एकमेकांवर हिंसक प्रहार करुन मराठी आणखी कमकुवत करावी हाच कुटील डाव यामागे आहे. मुंबईतील विविध मेट्रो स्थानकांना उद्योगांचे नाव प्रथम व मूळ नाव दुय्यम स्थानी देऊन भाजपने अकलेचे दिवाळे दाखविले आहेच. भाजपला खाजच असेल व खराखुरा मनापासून आदर भारतरत्न बाबासाहेबांबद्दल असेल तर इंदू मिल येथील प्रस्तावित भारतरत्न बाबासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करावी," अशी मागणी शिशिर शिंदेंनी केली आहे.
हा भाजपचा हलकट प्रयत्न
"मुंबईची संपूर्ण घडी विसकटून मुंबई व राज्याचे पार वाळवंट करुन मुंबईसह महाराष्ट्र उजाड करायचा हे कारस्थान मराठी माणूस हाणून पाडेल. महाराष्ट्र कमजोर करण्याच्या प्रयत्नात “कुटील भाजपच” हद्दपार होईल हे भाजप थिंकटॅंकने लक्षात घ्यावे. 17 नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन झाला आणि 24 तास उलटायच्या आतच भाजपने ही खेळी केली. हा खरा शिवसेनाप्रमुखांचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरेंनी दादरच्या नामकरणाचा डाव हाणून पाडला होता. आज “बाळासाहेब” शरीराने भूतलावर नसतील पण जातीभेद पूर्ण गाडून बाळासाहेबांनी उभे केलेले म-हाठी बांधव हा भाजपचा हलकट प्रयत्न हाणून पाडतील व भल्याभल्यांचे तोंड जमिनीवर आपटेल हे नक्की," असा विश्वास शिशिर शिंदेंनी व्यक्त केला आहे.