मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा कंपनीला काळ्या यादीत टाकू असा इशारा दिला आहे. इंदू मिल स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा ब्लॅकलिस्ट करू असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. इंदू मिल स्मारकासंदर्भातील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुतळ्याच्या आणि स्मारकाच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास शापूरजी पालोनजी कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे. 3 दिवसांत जलग गतीने अॅक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, कामाचे नेमके वेळापत्रक द्या. त्या वेळापत्रकाप्रमाणे काम झाले तरच पैसे देणार, अन्यथा नाही. इंदू मिल स्मारक कुठल्याही स्थितीत वेळेत पूर्ण करा. तांत्रिक बाबी पुढच्या 3 दिवसात पूर्ण करा असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच माणसं, मशीन वाढवा, पण आता दिरंगाई सहन करणार नाही. शापूर्जी पालमजी यांनी हवे तर इतर सर्व कामे बंद करावी, पण आता विलंब चालणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
आखाती देशातील युद्धामुळे ब्रासच्या किमती महागल्याने काम रखडल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. तसेच 350 कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली मात्र कामाच्या संदर्भात नाराजी दर्शवली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (14 एप्रिल) आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6डिसेंबर) दादर येथील चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी राज्य सरकारने कायमस्वरूपी मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यापूर्वी प्रत्येक वेळी पुष्पवृष्टीसाठी शासनाची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागत होती. मात्र, आता कायमस्वरूपी मान्यता मिळाल्याने नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. हेलिकॉप्टरची उपलब्धता, आवश्यक सुरक्षा परवानग्या आणि नियोजनाची जबाबदारी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.
यापूर्वी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरपूर्वी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागत होती, आता परवानगीची गरज लागणार नाही. शासनाच्या परवानगीशिवाय जिल्हाधिकारी यासंदर्भातील कार्यवाही करू शकतील, असे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी (अतिरिक्त कार्यभार) बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले.